तळेरे,दि.२२ जानेवारी
अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त सोमवारी तळेरे येथील ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सकाळ पासून दिवसभर विविध कार्यक्रमांना रामभक्त ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी सकाळी 10.30 वा. गुढी उभारण्यात आली. त्यानंतर श्री देव गांगेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यांनतर श्री राम प्रतिमेचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. दुपारी रामरक्षा व राम नाम जपासह विविध कार्यक्रम झालेत. या आनंद सोहळ्यात तळेरे पंचक्रोशीतील विविध ग्रामस्थ आणि रामभक्त भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळपासून तळेरे बाजारपेठ आणि संपूर्ण गावामध्ये भक्तीमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी नापणे येथील विनोद गोखले यांचे ‘ गीतरामायण ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दुपारी 1.30 पासून महाप्रसाद झाल्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ झाला. सायंकाळी 7 वा. मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने 500 दिवे मंदिर परिसरात प्रज्वलित करण्यात येऊन रोषणाई करण्यात आली. दरम्यान हरिपाठ सादर करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 7.30 वा. पासून स्थानिक भजने सादर झालीत. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.
कणकवली ग्रामोद्योग संस्था (जिल्हा – सिंधूदुर्ग) संचालक तथा कासार्डे येथील कलाकार दिलीप सावंत यांनी अयोध्या नगरीत होणा-या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा साेहळ्याच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्राची भव्य रांगोळी यावेळी काढली. उंची 35 फूट × रुंदी 20 फूट, साधारण 200 किलो रांगोळी वापरली आहे. सलग 3 दिवस दिलीप सावंत व त्यांचे सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.