मालवण तालुक्यातही प्रभू श्री राम मंदिरांसह इतर देवदेवतांच्या मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

0

मालवण दि २२ जानेवारी
पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या नगरीत प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र उत्साह संचारला असताना मालवण तालुक्यातही प्रभू श्री राम मंदिरांसह इतर देवदेवतांच्या मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्ताने मालवण शहरासह आचरे येथे रॅली काढण्यात आली. मालवण शहर व तालुक्यातील श्री रामाच्या व इतर देवदेवतांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी करून धार्मिक कार्यक्रमांचा आनंद लुटतानाच मंदिरात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

गेले अनेक वर्षांच्या प्रखर संघर्ष व न्यायालयीन लढ्यानंतर अयोध्या येथे श्री रामललाचे मंदिर बांधण्यात येऊन या मंदिरात आज श्री रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर अयोध्या येथील रामजन्मभूमी ट्रस्टच्या वतीने देशभरातील मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभर राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा उत्साहात साजरा होत असताना मालवण तालुकाही आज भक्तीपूर्ण वातावरणात रंगून गेला. मालवण शहरातील एसटी स्टॅन्ड नजीकचे राम मंदिर, गवंडीवाडा येथील राम मंदिर, मेढा येथील राम मंदिर यासह शहरातील व तालुक्यातील इतर विविध देवदेवतांच्या मंदिरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासूनच मंदिरांमध्ये स्पीकरवार वाजणाऱ्या राम गीतांनी वातावरण चैतन्यमयं बनले होते. अनेक ठिकाणी रामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे लावण्यात आले होते. मालवण शहर तसेच आचरा येथे राम नामाच्या जयघोषात रॅली काढण्यात आली. मंदिरांमध्ये पूजा अर्चा, राम रक्षा स्तोत्र पठण, राम नामाचा जप, कीर्तन, प्रवचन, महाआरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी भाविकांनी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती. तर अनेक मंदिरात दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही भाविकांनी गर्दी केली होती.

सायंकाळी मंदिरांमध्ये गीत गायन व भजने सादर झाली. तर मंदिररांसह सर्वत्र दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये भाविक हिरीरीने सहभागी झाले होते.