कारसेवकांची हिम्मत आणि कार्य आत्मसात करण्याची गरज – आमदार नितेश राणे

पुढे कार सेवकांना काशी आणि मथुरेला जेव्हा आदेश येतील तेव्हा जावं लागेल ;कणकवलीत कार सेवकांचा आमदार नितेश राणे यांनी केला सत्कार

राम मूर्तीची सुवर्ण प्रतिकृती व सुवर्ण राम पादुका आणि अयोध्या राम मंदिर प्रतिकृती दिली भेट

कणकवली,दि.२३ जानेवारी(भगवान लोके)

अयोध्येत राम मंदिर आणि देशात राम उत्सव हा आजचा दिवस कार सेवकांमुळे आला आहे. त्यांचे कार्य आणि हिम्मत प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे.आता पुढे कार सेवकांना काशी आणि मथुरेला जेव्हा आदेश येतील तेव्हा जावं लागेल,असे आवाहन कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांनी केले.

अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार सेवकांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार,संघाचे जिल्हा कार्यवाह लवु म्हाडेश्वर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,प्रकाश गोगटे, डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आ.नितेश राणे म्हणाले,
प्रवाहाच्या विरोधात जावून हिंदू समाजासाठी,धर्मासाठी कार सेवकांनी केलेली कामगिरी फार मोठी असते.आज जो सत्कार केला तो कार सेवकांचा कार्याचा आणि गुणांचा आहे. प्रभू श्रीराम म्हणजे एक ऊर्जा आहे. त्यांना पाहून ऊर्जा मिळते.आज जे वातावर पाहतो आहोत.तो कार सेवकांचे बलिदान आणि त्यागाची हे फळं आहे.विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगल, लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, स्व.बाळासाहेब ठाकरे अशा अनेक नेत्यांनी या साठी पुढाकार घेतला.त्याचा सुद्धा या यशात सिंहाचा वाटा आहे.
राम मंदिर राजकीय इच्छा असती तर या पूर्वी केले असते मात्र ती नव्हती.राम मंदिर वही बनायेंगे,या प्रत्येकाच्या मनातील गोष्टीला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखविले.मात्र काँग्रेसची सत्ता असताना राम जन्म भूमीवर प्रश्न निर्माण केला होता. वक्फ बोर्ड जी भूमिका घेते तीच भूमिका आता उध्दव ठाकरे घेत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर साठी जे केले ते सर्व मुलगा उध्दव ठाकरे यांनी घालविले असल्याची टीका आ.नितेश राणे यांनी केली.
आक्रमणे आजही सुरू आहेत, मात्र त्याचे स्वरूप वेगळे आहे. त्यामळे हिंदू राष्ट्र म्हणून सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी यांचीच सत्ता हवी हे लक्षात ठेवा आणि हिंदू धर्मा साठी सर्वांनी एक जुट ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार सेवक,माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले,पोलिसांचा पहारा माझ्या घरावर होता. तरीही पोलिसांचा डोळा चुकवून १५० लोक आम्ही अयोध्येला गेलो.या श्री राम यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दुःख होते. त्यांनी अयोध्या आक्रमणाने मुक्त करणार असे स्वप्ने होते. ते आज सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले.बाबराने देवळातील देव आणि घरातील स्त्री यांना बाटवायचे काम केले. हिंदू देवळे राहतील तो पर्यंत देशात लोकशाही असेल,हे वाक्य अटलजींच्या तोंडातील आहे. जेल मध्ये १५ दिवस काढले,पुन्हा १९९२ मध्ये गेलो.हा वाद हिंदू मुस्लिम नाही तर त्यावेळच्या मनिविकृतींचा वाद आहे.आम्ही प्रभू श्रीरामाच्या वंशज आहोत.जोपर्यत या देशात हिंदू जास्त राहतील तरच लोकशाही जिवंत राहील.

डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले, जिल्ह्यातील ४२ जणांनी कार सेवा काम केलं त्यामुळे आजचा दिवस आला आहे.१५२८ साली संघर्ष सुरु झाला आहे,हे विसरुन चालणार नाही.पुन्हा एकदा १६६० साली चाल झाली ,१८६० मध्ये ३ हजार हिंदू कार सेवकांना मारले गेले.विश्व हिंदू परिषदेचे काम मोठं आहे.कार सेवकांचा सत्कार होईल तेव्हा रक्त सांडले त्यांना आज चांगले वाटेल.रामाचे प्रतीक आजचा दिवस आहे.राम आपला आहे,वाद सोडा ,असे मोहन भागवत यांनी सांगितले.५०० वर्षांचा आज होणारा हा सन्मान आहे.

माजी आमदार अजित गोगटे म्हणाले,पहिल्या कार सेवेत आम्हाला त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यांनी खूपच त्रास दिला. रेल्वे,गाड्या इतर वाहने आडविली. आम्हाला अटक केली. जेवण सुद्धा दिले नाही अखेर झाशी मधून आमची जेवणाची व्यवस्था लोकांनी केली.मात्र,ठरलेल्या दिवशी मुण्यायाव्यात असे कार सेवक त्या ठिकाणी पोहोचले आणि परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली.त्यावेळी गोळीबार केला आणि दोन लोक जे बाबरी मशीद च्या घुमटावर चढले त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आजचा दिवस दिसला.

कार सेवक विद्याधर माळगावकर म्हणाले,
देवगड तालुक्यातील कार सेवकांची जबाबदारी आमच्यावर होती. तेव्हा ९० मध्ये राहिलेले काम ९२ मध्ये मी आणि दादा जुवटकर, दीपक तारी,दत्ताराम घाडी यांनी आतमध्ये घुसून राहिलेले काम पूर्ण केले होते. बाबरी पाडली होती.

संघ कार्यवाह लहू म्हाडेश्वर म्हणाले, स्वातंत्र्य मिळाले मात्र राम मंदिर होईना,त्यासाठी ७५ वर्षे जावी लागली आणि आज २०२४ उजाडले. त्यासाठी तीन लाख कार सेवकांनी आपले रक्त सांडले आहे.गंगा यात्रा,राम शिला अशा अनेक यात्रा झाल्या.१९९० आणि १९९२ च्या कार सेवा फारच महत्वाच्या होत्या.न्यायाचा लढा पुढे लढवा लागला.आणि २०१९ मध्ये न्यायालयाचा निर्णय आला. आपण सर्वांनी दिलेला एक रुपया आणि दिलेली विठ या राम मंदिर साठी लागली आहे. त्यामुळे हे सर्वांचे मंदिर आहे.हे राष्ट्र मंदिर आहे.