बुरंबावडे येथे रामदिवाळी जल्लोषात साजरी

तळेरे,दि.२३ जानेवारी

देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे अयोध्येतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम जल्लोषात साजरे करण्यात आले.

कलियुगातील रामराज्याच्या स्थापनेच्या अर्थात अयोद्धेतील रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभयोगाने देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे विविध कार्यक्रम जल्लोषाने साजरे झाले. बुरंबावडे गावची ग्रामदेवता श्री देव गांगेश्वराच्या मंदिरात सकाळी श्री महागणपती. श्री राम, श्री गांगेश्वर देवता व सर्व उपांगदेवता यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी श्री गांगेश्वर मंदिरात उदय दुदवडकर , रूपाली बंदरकर (गार्गी पाळेकर) व उपासना जाधव यांनी हस्त कौशल्यातून रांगोळीने साकारलेल्या श्री रामचंद्रांच्या सुबक प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेभोवती श्रीराम तेजोदीप स्थापण्यात आले.

सर्व देवांच्या विधिवत पूजनानंतर श्री देव गांगेश्वराच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. दुपारी महाआरती व महाप्रसाद समर्पित झाले. तद्नंतर महिलांच्या श्रीराम स्तुतीगीत गायनाचा व फुगड्यांचा कार्यक्रम झाला. महिलांचा हळदी-कुंकू प्रदान समारंभ पार पडला. पुढे सायंकाळी मंदिरात हजारो दिव्यांचा सर्व वयातील बाल, किशोर, युवक, युवती, प्रौढ व वृद्ध स्त्री, पुरुष या सर्वांच्या हस्ते उस्फूर्तपणे ननयनरम्य मनोहर असा एक हजार एकशे अकरा दिवे उजळवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर महिलांनी श्रीरामचंद्रांची स्तवनस्तोत्रे गायली. पुढे सायंकाळी सांज-आरती संपन्न झाली आणि रात्री बुरंबावडे ग्रामस्थ मंडळाच्या भजनाने कार्यक्रमाची भावूक सांगता झाली. येथील बुरंबावडे ग्रामविकास मंडळाने एकूण कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन केले होते.