मालवण,दि.११ जुलै
कांदळवन प्रतिष्ठान, इको फोक्स व्हेन्चर्स यांच्या वतीने आयोजित आणि मालवण येथील स्वराध्या फाउंडेशन, हॉटेल चैतन्य व उबंटू यांच्या वतीने सहप्रायोजित समुद्र संवर्धन विषयावर जिल्हास्तरीय बाल नाट्य स्पर्धा दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे होणार आहे. समुद्रात होणारा कचरा व त्यादृष्टीने करता येणाऱ्या उपाययोजना याविषयीची जनजागृती अशी या नाट्यस्पर्धेच्या विषयाची संकल्पना आहे, अशी माहिती गौरव ओरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील उबंटू कॅफे मध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी स्वराध्या फाउंडेशनचे गौरव ओरसकर, गौरीश काजरेकर, महेश काळसेकर मुकेश बावकर, सुनील परुळेकर, सुधीर गोसावी, आशिष पेडणेकर, सुधीर कुर्ले, शांती पटेल आदी उपस्थित होते.
सध्या मानवाकडून समुद्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे, समुद्र हि कचरा कुंडी नसून जैवविविधतेचे आगर आहे. कचऱ्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने या विषयाची बालनाट्याशी सांगड घालून मुलांचे परिणामी पालकांचे व समाजाचे प्रबोधन नाट्यरूपात करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे यावेळी गौरव ओरसकर यांनी सांगितले.
या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रू. १२ हजार, रू. ८ हजार, रू. ५ हजार तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ रू. २ हजार, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शन यासाठी प्रत्येकी रू. ५००, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच पुरुष अभिनय, स्त्री अभिनय व तांत्रिक अंगे यासाठी प्रत्येकी तीन क्रमांकांना चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे.
इच्छुक संघांनी आपली नावे प्रवेश फी रू. २०० व अनामत रक्कम रू. १ हजार यासह दि. २५ जुलै पर्यंत नोंदवावी. मालवण तालुक्याबाहेरील संघास रू. १२०० प्रवास खर्च देण्यात येईल, प्रथम येणाऱ्या ८ संघाना प्राधान्य देण्यात येईल, नोंदणी व माहितीसाठी गौरव ओरसकर ८२७५८६५६५५ व गौरीश काजरेकर ८४११०२८३२१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.