स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आज तळेरे येथे श्रध्दांजली व वृक्षारोपण करुन साजरा

तळेरे,दि.११ जुलै

सुप्रसिद्ध गझलकार, जेष्ठ कवी, पत्रकार, आनंदयात्री स्व.मधुसूदन नानिवडेकर यांचा आज ११ जुलै रोजी तिसरा “मधु स्मृती दिन” तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग मित्र परिवार या तिन्ही संस्थाच्या वतीने तळेरे येथील मधुकट्टयावरती नानिवडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर एसटी बस स्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मधुसूदन नानिवडेकर यांच्या पश्चात नानिवडेकर त्यांची चिरंतन स्मृती जपली जावी म्हणून दरवर्षी ११ जुलै रोजी मधुस्मृती दिन तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथील डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या चैतन्य हाॅस्पीटलच्या प्रांगणातील मधुकट्टयावरील स्मृती स्थळी त्यांच्या प्रतिमेला डॉ.मिलिंद कुलकर्णी, डॉ.ऋचा कुलकर्णी, दादासाहेब महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.

नानिवडेकर यांचा सर्वाधिक प्रवास हा एसटी बसने होत असे. एसटी बसशी जणू त्यांचे अतुट नाते होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्याचबरोबर तळेरे बसस्थानक परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सावली देणाऱ्या झाडांची कमतरता लक्षात घेऊन आणि तळेरे बसस्थानकात नानिवडेकर यांची कायमस्वरूपी आठवण रहावी म्हणून सावली देणाऱ्या विविध प्रकारच्या पाच वृक्षांचे वृक्षारोपण तळेरे एसटी बस स्थानक परिसरात करण्यात आले.

बसस्थानकात परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी तळेरे एसटी बस स्थानका प्रमुख अविनाश दळवी व निसर्ग मित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष व पत्रकार संजय खानविलकर, जेष्ठ पत्रकार व कवी,लेखक प्रमोद कोयंडे, डॉ.अभिजीत कणसे, पत्रकार निकेत पावसकर, युवा चित्रकार अक्षय मेस्त्री, सतीश मदभावे, दळवी महाविद्यालयाचे प्रा.प्रशांत हटकर, प्रा.हेमंत महाडीक, प्रा.श्री. गुरव, प्राथमिक शिक्षक जाकीर शेख, प्रसाद पाटील, सचिन विचारे, नवनाथ तोरसकर व अन्य नानिवडेकर प्रेमी तसेच संवाद परिवार, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार आणि निसर्ग मित्र परिवार या संस्थांचे सदस्य उपस्थित होते.