बांदा सटमटवाडी येथे महामार्गावर सुरु असलेल्या बोगद्याचे काम वैयक्तिक स्वार्थासाठी मूळ आराखड्यात बदल

बांदा,दि.१२ जुलै
बांदा सटमटवाडी येथे महामार्गावर सुरु असलेल्या बोगद्याचे काम वैयक्तिक स्वार्थासाठी मूळ आराखड्यात बदल करून करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे ठेकेदार, अधिकारी यांच्याशी लागेबंधे असल्याचा आरोपही सटमटवाडी ग्रामस्थांनी विशेष सभेत केला. यावेळी सरपंच व प्रभाग क्रमांक एक मधील तीन ग्रामपंचायत ग्रामस्थांना भरोश्यात न घेता परस्पर काही लोकांच्या आर्थिक स्वार्थसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांनी दिलगिरी व्यक्त करत जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन समर्पक उत्तरे देत नाहीत तोपर्यंत बांदा उड्डाणपूल व सटमटवाडी येथील बोगद्याचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सटमटवाडी येथील बोगदा व सेवा रस्त्यासंदर्भात ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, शिल्पा परब, रेश्मा सावंत, रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, रत्नाकर आगलावे, साईप्रसाद काणेकर, ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प समन्वयक अनिल सराफ आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरले. ग्रामस्थ जिवबा वीर व आनंद वसकर यांनी आतापर्यंत याठिकाणी अपघात होऊन ९ जणांचा बळी गेला आहे. ही अपघातांची मालिका खंडित होण्यासाठी याठिकाणी बोगदा होण्याची मागणी करण्यात आली. याठिकाणी सटमटवाडीत जाण्यासाठी बोगदा व दोन्ही बाजूनी सेवा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. मात्र एका व्यक्तीच्या व ग्रामपंचायतच्या स्वार्थासाठी ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर यांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून १६ ग्रामस्थ्यांच्या फसवून सह्या घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यासाठी श्री धारगळकर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र याला ग्रामस्थांनी विरोध करत ग्रामपंचायत प्रशासनाने स्वतःचा स्वार्थ बघत लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. बोगद्याचा आराखडा बदलून पूर्णपणे स्थानिक ग्रामस्थ व संघर्ष समितीला अंधारात ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आतापर्यंत सीमा तपासणी नाका व कालव्यासाठी अल्प दराने शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. शासनाने एक रुपया देखील नुकसान भरपाई दिलेली नाही. हा रस्ता व बोगदा ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनानेच दबाव आणून मूळ आराखड्यात बदल केल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

बांधकाम खात्याला दिलेले पत्र चुकीचे
ग्रामपंचायतने सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र देऊन बोगदाच्या आराखड्यात बदल करण्याचे सुचविले. या पत्राची प्रत ग्रामस्थांनी सभेत दाखवत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामस्थांना अंधारात ठेवत कोणाच्या आशीर्वादाने व दबावाने सदरचा आराखडा बदलण्यास सांगितले असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी जर आपला प्रश्न मिटत असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले.

मूळ आराखड्यानुसार काम करावे
यावेळी ग्रामस्थांनी आराखड्यात कोणताही बदल न करता मूळ आराखड्यानुसार काम करण्याची मागणी केली. मूळ आराखड्यात बोगदा व बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र आता सुरु असलेल्या कामानुसार केवळ गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूकडेच सेवा रस्ता देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूने सेवा रस्ता रद्द करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. त्यामुळे मूळ आराखड्यानुसारच काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प समन्वयक सराफ यांनी बोलताना मूळ आराखड्यात दोन्ही बाजूला सेवा रस्ता असल्याचे मान्य करत ग्रामपंचायतच्या मागणीनुसार आराखड्यात बदल केल्याचे मान्य केल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झालेत. केवळ एका व्यक्तीसाठी वैयक्तिक स्वार्थ न बघता ग्रामपंचायतने लोकांचा विचार करून कृती करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जोपर्यंत कार्यकारी अभियंता दर्जाचे वरिष्ठ सक्षम अधिकारी येऊन समर्पक उत्तरे देत नाहीत तोपर्यंत महामार्गावरील दोन्ही कामे बंद ठेवण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यावेळी बोगद्याला पर्यायी रस्ता रद्द करून सेवा रस्ता देण्यासाठी पत्र देणार असल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले. यावेळी अधिकारी सराफ यांनी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या लेखी द्याव्यात, या मागण्याना आपण वरिष्ठ कार्यालयात मागणीसाठी पाठवून देतो असे आश्वासन दिले.
पर्यायी मार्गाची अवस्था सुद्धा दयनीय
बोगद्याच्या कामासाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या पर्यायी मार्गाला अजून पर्यंत कंत्राटदरांकडून साधी माती सुद्धा टाकण्यात आली नाही, मात्र याकडे ग्रामपंचायत सदस्य यांना पाहण्यास ही वेळ नाही, याच पर्यायी मार्गाने मुले शाळेत जातात, स्त्रिया बाजारात जात असतात मात्र हा रस्ता धड चालायच्या स्थितीत नाहीय. अनेक वेळा मुले या वाटेवर जाताना पडल्याची घटना घडल्या आहेत या कडे स्थानिक प्रशासनचे लक्ष नाही. मात्र २-४ दुकाने वाचवण्यासाठी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी वेळ आहे पण पूर्ण सटमट वाडीला होणाऱ्या अडचणी मात्र त्यांना दिसत नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
अन्यथा उपोषण
दहा दिवसात मुख्य कार्यकारी अभियंता यांनी उपस्थिती लावली नाही, तसेच बोगदा आणि त्याचे पर्यायी मार्ग जुन्या आराखड्या नुसार नियमाने आहेत त्या नुसार लवकर कामाला सुरवात व्ह्यायला हवी. अन्यथा बायका – मुले घेवून सर्व ग्रामपंचायत विरोधात महामार्गावर उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी सटमट येथील ग्रामस्थांनी दिली
ॲप्रोच रोड रद्द करण्याच्या सूचना – सरपंच
ग्रामपंचायत कडून चूक झाल्याची यावेळी सरपंच प्रियांका नाईक यांनी मान्य करून , ग्रामस्थांचा असलेला विरोध पाहून पर्यायी मार्ग आराखड्यात बदल करून दुसऱ्या ॲप्रोच रोड करण्यात येणार होता तो ॲप्रोच रोड रद्द करून मूळ आराखड्यानुसार काम करण्यात येईल असे यावेळी सरपंच यांनी मान्य केले.