स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटार सायकल चोरीतील आरोपींना अटक

चोरीतील बुलेट मोटार सायकल केली हस्तगत

कणकवली दि.१२ जुलै(भगवान लोके)

कुडाळ शिवाजी महाराज पार्क, तुपटवाडी येथून बुलेट मोटर सायकल (MH-07-AM-8937) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेलेली होती. भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे गुन्हा 13 जून 2024 रोजी दाखल होता.याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटार सायकल चोरीतील आरोपींना अटक करीत चोरीतील बुलेट मोटार सायकल हस्तगत केली.

मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक यांनी सूचना दिलेल्या होत्या.त्याप्रमाणे मोटार सायकल चोरीचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशेष पथके नियुक्त केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना 11 जुलै 2024 रोजी गुन्ह्यात चोरीस गेलेली वरील बुलेट मोटर सायकल ही गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे राहणारे दोन चोरट्यांनी चोरल्याचे तपासामध्ये उघड झाले.

आरोपींचे वास्तव्याबाबत खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग पोलीस निरीक्षक हेंमचंद्र खोपडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे जाऊन, आरोपींविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यांचा गडहिंग्लज तालुक्यात कसोशीने शोध घेवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांचेकडे तपास चौकशी करुन गुन्ह्यात चोरीस गेलेली 1 लाख रुपये किंमतीची बुलेट मोटर सायकल आरोपींकडून हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. दोन्ही आरोपी व मोटार सायकल पुढील कायदेशीर कारवाईकरीता कुडाळ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले असून पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग पोलीस निरीक्षक हेंमचंद्र खोपडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उपनिरीक्षक गुरूनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, बस्त्याव डिसोजा व चंद्रकांत पालकर यांनी केलेली आहे.