राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळ यांचे आयोजन, ५, १०, २१ किमीची भव्य हाफ मॅरेथॉन
सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, गोवा येथून धावपटूंचा सहभाग
कुडाळ,दि.१२ जुलै
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन २०२४ च्या वतीने “एव्हरी रनींग स्टेप मेक युअर हार्ट स्ट्रॉंगर” अशी टॅगलाईन घेऊन ५, १० व २१ किलोमीटरची पावसाळी आंतरराज्य हाफ मॅरेथॉन स्पर्धा १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथून ही स्पर्धा सुरु होणार आहे. सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी येथून ७५० धावपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन २०२४ सज्ज झाली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष जी. टी. राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी कुडाळ येथे केले.
कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ. पै. शिक्षण संस्था येथे आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रुपेश तेली, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. संजय केसरे, डॉ. प्रशांत मडव आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जी. टी. राणे म्हणाले, राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे २०२२ पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे. आरोग्यासाठी चालणे किंवा धावणे महत्त्वाचे आहे. व्यायाम व आरोग्याबद्दलची जनजागृती व्हावी, यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसिएसन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने हा उपक्रम पार पाडणार आहेत.
या मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहेत. रत्नागिरीचे आयर्न मॅन डॉ. तेजानंद गणपत्ये व मुंबईचे आयर्न मॅन अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मान्सून रनची शोभा वाढवेल, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी ७५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. स्पर्धेसाठी साधारण २०० स्पर्धक सहभागासाठी इच्छुक होते. ८ जुलै पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असल्यामुळे त्यानंतर सहभागासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी करून घेणे शक्य झाले नाही. ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाणार आहे. यावर्षी ज्या स्पर्धकांना सहभागी होता आले नाही ते स्पर्धक पुढील वर्षी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटामधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख पारितोषिकही देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जातील.
कुडाळ एमआयडीसी बॅ. नाथ पै मधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूरमार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल. तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, स्पर्धकांना प्रोत्साहित करावे, पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले.