हडी येथे मारुती मार्गेश्वर मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रम संपन्न

मालवण,दि.२३ जानेवारी

अयोध्या येथे श्रीराम मंदिरात राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त हडी येथील मारुती मार्गेश्वर मित्रमंडळ कोथेवाडी मधलीवाडी मित्र मंडळाच्या वतीने रामनामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच हनुमान मंदिर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले.

अयोध्या येथील राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त हडी येथील हनुमान मंदिरात सकाळी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन होऊन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर साडे अकरा वाजता हडी येथील कालावल पुलापासून गणेश मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बहुसंख्य तरुण, ग्रामस्थ व महिला मोटारसायकलने सहभागी झाल्या होत्या. यावेळी राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. यावेळी रामनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले. या मिरवणुकीत विदेशी पर्यटकही सहभागी झाले होते. यानंतर हनुमान मंदिरात दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सुस्वर भजने सादर झाली. त्यानंतर श्री रामाची भव्य रांगोळी काढून व दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर वारकरी दिंडी भजनाचा कार्यक्रम झाला.

तर आज दुपारी महाप्रसाद, सायंकाळी अमृतनाथ पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा कुर्मदासाची वारी हा नाट्यप्रयोग सादर झाला. यानिमित्त दि. २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.