वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचे प्रतिपादन;साकेडी मध्ये जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे उद्घाटन
कणकवली, दि.२४ जानेवारी(भगवान लोके)
भजन क्षेत्रामध्ये नवीन पिढी फारशी रुळत नाही. मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपारिक भजनांचे प्रकार समोर आणत असताना आम्ही चक्रीभजन प्रकार सुरू केला. जेणेकरून तरुणाई यामध्ये आकर्षित होईल. भजन क्षेत्र अजून समृद्ध करण्यासाठी आपला हातभार लावावा यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. आज वारकरी भजन स्पर्धा आयोजित केल्या हा आजचा दिवस आपल्या साठी ऐतिहासिक व अविस्मरणीय असा आहे. अयोध्ये मध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना आपल्या गावामध्ये होत असलेल्या या स्पर्धा हे निश्चितच आपल्या गावासाठी देखील अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन वृद्ध कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी केले.
कणकवली तालुक्यातील साकेडी येथे जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे उद्घाटन संतोष कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच सुरेश साटम, भजन संस्थेचे माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, माजी सभापती संजय शिरसाट, परीक्षक विलास ऐनापुरे, बुवा गोपी लाड, उद्योजक भूषण वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, संजय मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु सदवडेकर, सूत्रसंचालक राजा सामंत, चंद्रकांत बाबर्डेकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, ताता गुरव, बबन राणे, लक्ष्मण राणे, शामसुंदर राणे, गणेश पारकर, विनायक राणे, राजाराम गुरव आदी उपस्थित होते.
संतोष कानडे पुढे म्हणाले,आपण परमार्थ करतो,तो पुढच्या पिढीसाठी असतो. आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्वसामान्य वृध्द कलाकारांना माझ्याकडील पदातून न्याय देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आपली हिंदू संस्कृती ढासळत चालली असताना तिला उभारी देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. जुन्या बाबत आपल्यात आत्मीयता असते वारकरी भजन स्पर्धेच्या माध्यमातून या मंडळांनी जपल्याचे कौतुक उद्गार देखील त्यांनी काढले.
या स्पर्धेमध्ये आलेल्या भजन मंडळांनी परफार्मन्स चांगला करा, कोणत्याही क्षेत्रात शिकत असताना आपण अखेर पर्यत विद्यार्थी असतो. कोणीच कुठल्या क्षेत्रात पारंगत नसतो. केंद्रीय उद्योगमंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या खात्याकडे हजारो उद्योग आहेत. यातील मी मक्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग निवडला आहे. या करिता मका लागवड केली. कोणत्याही क्षेत्रात मेहनतीची सवय हवी, शेतीशी नाळ जुळायला हवी. तरच माती फळ देते. असे श्री. कानडे यांनी केले.
यावेळी विलास गावकर, बुवा गोपी लाड, भूषण वाडेकर, समीर मोरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध मंडळांनी वारकरी भजन सादर केले. कार्यक्रमाचे आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.
या स्पर्धेमध्ये विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, आचरा यांनी प्रथम तर स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ किंजवडे यांना द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत उत्कृष्ट पखवाज वादक विपुल सावंत, उत्कृष्ट गायक विश्राम घाडी वीर महापुरुष प्रासादिक भजन मंडळ श्रावण यांना देण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भूषण शिरसाठ, प्रणय दळवी, सागर मेस्त्री, सागर राणे, निनाद नर, रुपेश मेस्त्री, रोहित राणे, भास्कर दळवी,ललित राणे, महेश मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, सागर मुणगेकर, गोटया शिरसाट, निलेश सावंत आदींनी मेहनत घेतली.