डोंबिवली कोकणवासीय मित्र मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

डोंबिवली,दि.२३ जानेवारी

कोकणवासीय मित्र मंडळाला आज ३६ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे तरूणपिढीच्या हाती जबाबदारी संपवून आम्ही मागदर्शकच्या भूमिकेत त्यांच्या पाठीशी उभे राहूया असे ठरवले आहे.” असे मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक पांडुरंग चोपडेकर यांनी डोंबिवली येथे सव्हश सभागृहात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिपप्रज्वलन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. मंडळाचे विश्वस्त शशिकांत पराडकर, सचिव रत्नाकर सारंग, उपसचिव शीतल धुरी, खजिनदार बापू कुबल, महिला आघाडी प्रमुख अनघा चोपडेकर आदींच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्ष अशोक चोपडेकर पुढे म्हणाले की, डोंबिवली पूर्व पश्चिम भागात आपले समाज बांधव विखरूले असल्याने गटप्रमुखाची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून अधिक जोमाने विस्तार करायचा असून आपल्या सहकार्याची गरज असल्याचे नमूद केले. याप्रसंगी विश्वस्त शशिकांत पराडकर यांनी मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत कार्याचा आढावा घेतला. सहदेव कोळंबकर यांनी शैक्षणिक दृष्ट्या आपल्या मंडळाच्या मुलांनी प्रगती साधून शैक्षणिक प्रगती साधावी याकरिता प्रोत्साहन म्हणून आठ हजार रोख रक्कम जाहीर करून त्यातून पारितोषिक देण्यात यावीत असे सांगितले. लहान मुलांनी वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मंत्रमुग्ध केले. यावेळी महेंद्र धुरी, शुभम धुरी, सुवर्णपदक विजेता अखिलेश सारंग या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा भेट वस्तू प्रदान करून गौरव करण्यात आला. अंकशास्त्र ज्योतिष हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल छाया मोटे, सलग ३६ वर्षे छपाई मोफत करून देत असल्याबद्दल विशेष सत्कार अध्यक्ष चोपडेकर व विश्वस्त पराडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन भूषण मुणगेकर आणि सहदेव कोळंबकर यांनी मौलिक शब्दात केले. मोठ्या संख्येने स्नेहमेळाव्याला कोकणवासीय उपस्थित होते.