स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर असा संदेश देऊन लोकप्रतिनिधी,प्रशासनाला चांगलीच चपराक…

स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर या घोषवाक्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी,प्रशासनाला जाग येणार का ?

देवगड,दि.२३ जानेवारी 

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीतील कॉलेज नाका येथे दुर्गंधीयुक्त पाणी गटारामध्ये सोडत असल्यामुळे अज्ञाताने देवगड निपाणी रस्त्यावर स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर असे घोषवाक्य मोठ्या अक्षरात लिहिल्यामुळे शहरात चांगली चर्चा रंगली आहे.हे वाक्य कोणी लिहिले हे मात्र अद्यापही समजले नाही.

देवगड कॉलेज नाका ते मांजरेकर नाका यादरम्यान सांडपाणी वाहण्यासाठी गटाराची व्यवस्था आहे.परंतु ते गटार योग्य प्रकारे नसल्यामुळे त्या आजूबाजूच्या दुकानदार राहणाऱ्या व्यक्तींना दुर्गंधीचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार सभागृहात याबाबत आवाज उठवून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यारिकेत येत असल्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.नागरिकांनी तक्रार करून देखील याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही.त्यामुळे सुज्ञ नागरिकाने स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर असा संदेश देऊन एक प्रकारे चांगलीच प्रशासनाला चपराक लगावली आहे.

तसेच देवगड निपाणी रस्त्यालगत मच्छीमार महिला मच्छी विक्रीसाठी बसत असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागत आहे.प्रशासनाकडे वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी कारवाईची मागणी करून देखील सुस्त प्रशासनाला याकडे ढुंकून बघण्यासाठी साधा वेळ नसल्यामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आता तरी प्रशासनाला या अज्ञात सुज्ञ शहरातील नागरिकाकडून लिहिलेल्या स्वच्छ सुंदर सेंटेड देवगड शहर या घोषवाक्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.