राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये रिद्धी हडकर हिची निवड

कणकवली दि.२४ जानेवारी(भगवान लोके)

राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये रिद्धी हडकर तर संघाच्या प्रशिक्षकपदी सौ. शितल जाधव यांची निवड झाली आहे.

सिंधुदुर्गस्थित चार जणांची निवड
कर्नाटक मंड्या येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी सौ.शितल मिलिंद जाधव तसेच महाराष्ट्र राज्य संघात कुमारी रिद्धी नितीन हडकर यांची निवड झालेली असून त्यांच्या या याच्याबद्दल जिल्हा व राज्यभरातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

24 जानेवारी दरम्यान कर्नाटक, मंड्या येथे राष्ट्रीय शालेय 19 वर्षाखालील मुले व मुली यांची कबड्डी स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर 17 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे पार पडले. या राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता 19 वर्षाखालील मुलींच्या संघांमध्ये कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयामध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत असणारी मालवण येथील जय गणेश कबड्डी संघातून खेळणारी खेळाडू कुमारी रिद्धी नितीन हडकर हिची या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेली असून ती कोल्हापुर विभागाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचप्रमाणे मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील रहिवासी आणि सद्या मुंबई शहर मधून खेळणाऱ्या कु. ऊर्जा साळगावकर व कु.समृद्धी भगत यांची देखील राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता कै. कुणाल बागवे कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कबड्डी खेळाडू, कबड्डीवर नितांत श्रद्धा व प्रेम असणारे शारीरिक शिक्षण या विषयांत कबड्डी खेळामध्ये पीएचडी मिळवलेले कणकवली वरचीवाडी येथील रहिवासी डॉ. मिलिंद मधुकर जाधव यांच्या पत्नी, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या सौ.शितल मिलिंद जाधव यांची प्रशिक्षिका म्हणून निवड झालेली आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या आणि मातीतील कबड्डी हा खेळ जोपासणाऱ्या सौ. शितल जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा 2007 या वर्षाचा शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला असून त्यांनी दोन वेळा आंतरराष्ट्रीय बीच कबड्डीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक देखील मिळवलेले आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पाठीशी असणाऱ्या शितल जाधव(मारणे) यांनी महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ व कुमारी गट संघाचे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रशिक्षक पद देखील भुषविलेले आहे.
क्रीडा प्रशिक्षणातील एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सौ. शितल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपद पटविण्यासाठी सज्ज झालेला आणि राष्ट्रीय स्पर्धेकरीता रवाना झालेला संघ पुढीलप्रमाणे -कल्याणी कडोळे ,आर्या पाटील,आरती चव्हाण ,गौरी दहे ,रिद्धी हडकर,सुरेखा कदम,समृद्धी भगत,ऊर्जा साळगावकर,स्नेहल कोळी,तनुश्री ठाकरे,वैष्णवी काळे,कल्याणी मेहेर संघप्रशिक्षिका – सौ.शितल जाधव (मारणे),संघ व्यवस्थापक – अमोल जमदाडे असणार आहेत.