प्राचार्य अविनाश मांजरेकर यांचा उपक्रमशील प्राचार्य म्हणून पुणे येथे सन्मान

आय.आय.बी.एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व जेट इंडिया यांकडून प्राचार्य अविनाश मांजरेकर यांचा सन्मान

तळेरे,दि.२४ जानेवारी

शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विद्यापीठ असते.विद्यार्थीना घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व आदर्श मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा खऱ्या अर्थाने सृजनाचा पाया असतो, हा उद्देश सतत मनामध्ये जागृत ठेवा अशी आपल्या सहकारी शिक्षकांना प्रेरणा देणारे वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांचा उपक्रमशील प्राचार्य म्हणून चिंचवड पुणे येथे सन्मान करण्यात आला.आय.आय.बी. एम.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि जेट इंडिया आयोजित वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कार्निवल 2024 या कार्यक्रमात हा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी आमदार आप्पासाहेब बनसोडे,ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय वेरनेकर, जेट इंडिया ग्रुपचे सीईओ शिरीन वस्थानी, नगरसेविका मीनल यादव, टुरिझम पुणे डिव्हिजनच्या डेप्युटी डायरेक्टर क्षमा पवार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
देशांतर्गत व देशाबाहेरील पर्यटनाचा विकास होण्यासाठी तेथील विद्यार्थ्यांनी 40 देशांतील पर्यटन स्थळांची माहिती देत, त्यांच्या प्रतिकृतींव्दारे सादरीकरण केले.

आपला विद्यार्थी सुद्धा समाजात कुठे कमी पडू नये याउद्देशाने शाळेतील शिक्षणाबरोबरच समाजात वावरण्याचे त्यांचे कौशल्यही वर्धिष्णू व्हावे यासाठी प्रशालेमध्ये विविध उपक्रम व शैक्षणिक सहलींचे सहकार्यांच्या मदतीने यशस्वीरित्या आयोजन करुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्याचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले

या सन्मानाबद्दल तळेरे पं. शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण खटावकर, शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडीक,सर्व शाळा समितीचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी-आजी सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.