चित्रपटसृष्टी एक करियर विकासाची सुवर्णसंधी- श्री.अशोक राणे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक

वैभववाडी,दि.२४ जानेवारी
आज दिनांक २४ जानेवारी,२०२४ रोजी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी ११.३० वाजता ख्यातनाम व आंतरराष्ट्रीय किर्तीचे सिने समीक्षक मा. अशोक राणे यांची विद्यार्थी संवाद कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये “सिनेमा पाहणारा व जगणारा माणूस” या त्यांच्या साहित्य संपदेवर व्याख्यान संपन्न झाले.या व्याख्यानामध्ये त्यांनी आपल्या चित्रपट समीक्षक जीवनातील विविध अनुभव आणि चित्रपटातील काही मनोरंजक तसेच समाज प्रबोधनात्मक विषयावर प्रकाश टाकला. चित्रपट ज्युरी, समीक्षक, लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक अशा विविध भूमिकेतून सिनेसृष्टीचे विद्यार्थ्यांना दर्शन घडवून आणले. तर विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे व आपले जीवन समृद्ध करावे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना सिने सृष्टीतील वेगवेगळे क्षेत्रामध्ये आपले करिअर करावयाचे असल्यास मी निश्चितपणे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन केले. उत्कृष्ट चित्रपट नाटक पुस्तके आत्मचरित्रे ही आपल्या जीवनाला दिशा देत असतात. यातून आपल्याला अंतस्थ प्रेरणा मिळते हीच प्रेरणा आपल्या जीवनामध्ये उत्तुंग यश मिळवून देते. आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून आपल्यातील देव शोधता येतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहसचिव मा. विजय रावराणे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले कला गुण ओळखून आपल्या जीवनाची दिशा ठरवावी श्री.अशोक राणे यांच्या व्याख्यानाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले करिअर निवडावे. विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर अशाच विविध क्षेत्रातील कार्यशाळांचे आपण महाविद्यालयामध्ये आयोजन करू असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यशाळेची सुरुवात आनंदीबाई रावराणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर मा.अशोक राणे व महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे सहसचिव विजय रावराणे, विश्वस्त प्रभानंद रावराणे, शरदचंद्र रावराणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम.आय कुंभार,प्रा. डॉ. एन व्ही गवळी अधीक्षक श्री. संजय रावराणे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.व्ही. ए.पैठणे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. आर.ए.भोसले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.एन.ए.कारेकर यांनी केले.