दिक्षित फाउंडेशन बोध चिन्ह अनावरण सोहळा
देवगड,दि.२४ जानेवारी
समाज सेवेमुळे मनुष्याला पुण्य मिळते आणि हे पुण्य मिळविण्याचे काम समाज सेवेमधून निरंजन दिक्षित यांनी केले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देवगडमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. हे उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाज सेवा व सहकार्य देणारी व्यक्ती फार दुर्मिळ झाली आहे मात्र दिक्षितांच्या माध्यमातून मिळालेले सामाजिक वैभव हे फार मोलाचे आहे. असे मत माजी आमदार अजित गोगटे यांनी जामसंडे येथे दिक्षित फाउंडेशन बोध चिन्ह अनावरण सोहळयाच्यावेळी व्यक्त केले.
जामसंडे सांस्कृतिक भवनमधील दिक्षित फाउंडेशन बोधचिन्ह अनावरण सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, दिक्षित फाउंडेशनचे निरंजन दिक्षित, राजाभाऊ दिक्षित, डॉ.अरुण खाडीलकर, डॉ.के.एन.बोरफळकर आदी उपस्थित होते.
निरंजन दिक्षित यांचे देवगड तालुक्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून त्यांच्या दातृत्व पणामुळे आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणगी देवून प्रगती करण्याचे काम ते करीत आहेत. हे सामाजिक व शैक्षणिक गोरगरीब जनतेची सेवा करीत असल्यामुळे दिक्षित फाउंडेशन बोध चिन्हाच्या माध्यमातून पुढील समाजसेवा केली जाणार आहे. यामुळे त्यांनी दिक्षित फाउंडेशन बोध चिन्ह स्थापन केले आहे.
यावेळी डॉ.के.एन.बोरफळकर बोलताना म्हणाले की, निरंजन दिक्षित सारखी व्यक्ती देवगड तालुक्याला मिळणे म्हणजे तालुक्याचे भाग्यच आहे. त्यांनी पडेल,वाडा,देवगड माध्यमिक शाळांना लाखो रुपये देणगी देवून शाळांना अर्थसहाय्य केले आहे. आजचे विदयार्थी हे सनदी अधिकारी व्हावेत हेच त्यांचे ध्येय व विदयार्थी घडविण्याचे भवितव्य आहे असे ते म्हणाले.
यावेळी जामसंडे हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक अरुण सोमण,महेश मराठे,सदाशिव ओगले,विकास दिक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निरंजन दिक्षित यांनी देवगड तालुक्यामध्ये पडेल,वाडा व देवगड येथील शेठ.म.ग.हायस्कुलला लाखो रुपयांची देणगी तसेच संगणक कक्ष, बँचेस, विदयार्थ्यांना साहित्य अश्या स्वरुपात दिले आहे. तसेच त्यांनी पुरळ,हुर्शी प्राथमिक शाळांतील मुलांनाही दरवर्षी ते शैक्षणिक साहित्य देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामधील त्यांचे फार मोठे योगदान आहे. यामुळे त्यांच्या दिक्षित फाउंडेशन बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाच्यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी दिक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार असल्याचेही निरंजन दिक्षित यांनी सांगितले. व यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिरगाव हायस्कुलचे शमशुददीन अत्तार यांना देवून त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार रेश्मा जोशी यांनी मानले.