संबंधितांवर कठोर कारवाई करा : वेंगुर्ले शांतता समितीच्या बैठकीत मागणी

वेंगुर्ले शांत : अफवांवर विश्वास ठेवू नका : पो.अधिकारी संध्या गावडे

वेंगुर्ले,दि.२४ जानेवारी
हिंदू मुस्लिम वादावरून वेंगुर्ले शहरात काल घडलेला प्रकार नाही. तो प्रकार जाफर नामक व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे घडला आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आजच्या शांतता समितीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी केली. तर वेंगुर्लेवासीयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा व सुव्यवस्था बिघडून समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती करू नका शांतता राखा. कोणतीही तक्रार असल्यास पोलिसांची संपर्क साधा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी केले आहे.
समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा स्टेटस सोशल मीडियावर ठेवण्याच्या रागातून निर्माण झालेल्या वादामुळे मोठ्या संख्येने हिंदू बांधव मंगळवारी रात्री वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे गोळा झाले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा अशी सर्वांची मागणी होती. याच दरम्यान काही जणांनी आपला मोर्चा बाजारपेठेत वळवला. पिराचा दर्गा येथील मशिदी जवळ येऊन भारत माता की जय, जय श्रीराम अशी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्याच दरम्यान काहींनी बाजूच्या अन्य धर्मियांच्या दुकानांना लक्ष करून तोडफोड केली. तर काहींनी मशिदीवरील भोंगे काढण्याची जोरदार मागणी केल्याने पोलिसांनी संबंधितांना सांगून ते भोंगे मशिदिवरून उतरवले. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू होता. हे सर्व प्रकरणामुळे वेंगुर्ले शहरात चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वेंगुर्ले शहरासह तालुक्यात शांतता राखली जावी यासाठी पोलिसांनी सकाळी शहरातून संचलन केले. त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्या उपस्थितीत आज वेंगुर्ले पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी वेंगुर्ले व्यापारी संघ अध्यक्ष श्री. विवेक खानोलकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जमातुल मशीद ट्रस्ट वेंगुर्ले चे शब्बीर गोलंदाज, सिद्दीक गोलंदाज, कॅम्प मशीद अध्यक्ष नेहाल शेख, सेक्रेटरी इमरान शेख, हमीद शेख, महमंदअली मुल्ला, महमंदसलिम मुल्ला, सईद शेख, फकीर नाईक, ह्यातखाब मकानदार, रफिक शेख, काँग्रेस चे सिध्देश परब, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, राष्ट्रवादीच्या नम्रता कुबल, ऊ.बा.ठा. तालुका प्रमुख संजय गावडे, बाबुराव खवणेकर, वामन कांबळे यांच्या सह शांतता समितीचे सदस्य आणि प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, पोलीस निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभा खानोलकर म्हणले की,
एकामुळे वेगळा मेसेज समाजात जातो. हे चुकीचे असून यामुळे समाजात दुरावा निर्माण होतो. शांत वेंगुर्ले मध्ये मेसेज द्वारे मन दुखावणारी कृती योग्य नाही. खवणेकर सर यांनी सांगितले रेडी, सावंतवाडी मध्येही असेच मेसेज आले. जाणून बुजून अशी कृत्य होतात हे थांबले पाहिजे. हिंदू समाज शांत आणि जागरूक आहे, मात्र अती कोणी करू नये. पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी मागील गोष्टी उगळून काही होणार नाही. आपला वेंगुर्ले तालुका शांत तालुका आहे, ही शांतता आणि सुसंस्कृतपणा कायम राहण्यासाठी सर्वांनी संयमाची भूमिका घ्यावी असे आवाहन केले.
बाळू देसाई यांनी बोलताना वेंगुर्ले मधील स्टेटस ची कृती ही लिटमस टेस्ट होती. आमचं कोण काय करणार ही एक प्रवृत्ती बळावत होती. मात्र जागरूक हिंदू बांधवांनी ती मोडून काढली. वेंगुर्ले मध्ये हिंदू मुस्लिम वाद नाही. सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. मात्र जाफर नामक एका व्यक्तीमुळे हा सगळा प्रकार घडला आणि मग उद्रेक झाला. यानंतर सुनिल डूबळे, संजय गावडे यांनीही हे बरोबर असल्याचे सांगून मुस्लिम समाजाने समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या जाफर ला कडक शब्दात समज द्यावी अशी मागणी केली.
मुस्लिम समाजाच्या वतीने बोलताना गोलंदाज यांनी प्रथम कालच्या प्रकाराबाबत हिंदू बांधवांची माफी मागितली. गेल्या पन्नास वर्षात वेंगुर्ले मध्ये हिंदू मुस्लिम वाद कधीच झाला नाही. कालची घटना ज्याच्या मुळे घडली आहे त्याला पोलिसांनी कठोरात कठोर शिक्षा करावी अशी आमची सर्वांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान काल रात्री उद्रेकातून घडलेल्या प्रकारात ज्या दुकादारांचे नुकसान झाले त्यांना मदत म्हणून पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी स्वतःकडून दहा हजार रुपये, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दहा हजार रुपये, संजय गावडे यांनी पाच हजार रुपये, मकानदार यांनी पाच हजार रुपये अशी एकूण तीस हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली.