शिवसेना उबाठाच्या त्रिकूटाने आरोग्य यंत्रणेची नाहक बदनामी थांबवावी

जिल्हा आरोग्य यंत्रणेवर टीका करून राजकीय नौटंकी सुरु ;आ.नितेश राणेंच्या माध्यमातून रुग्णांची होणारी गैरसोय दूर

कणकवली,दि.२४ जानेवारी (भगवान लोके)
शिवसेनेच्या वतीने कणकवली विधानसभा मतदार संघात आरोग्य शिबिर सुरु आहेत. या आरोग्य शिबिरांमध्ये शिवसेनेच्यावतीने आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटर वर असल्याचा आरोप करण्यात आले.मात्र,या शिबिरांमध्ये आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया या शासकीय जि.प. आरोग्य विभाग व जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत केली जात आहेत.त्यामुळे शिवसेना उबाठाच्या त्रिकूटाने आरोग्य यंत्रणेची व महायुती सरकारची नाहक बदनामी थांबवावी,असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी दिला आहे.

शासनाच्या आरोग्य यंत्रणा वापरुन शिबिर राबवत आहेत,मात्र दुसरीकडे आपण जाणूनबुजून बदनामी करता हे सिद्ध झाले आहे.राज्य सरकार आरोग्य यंत्रणा सुधारण्यात अपयशी ठरली,हे शिवसेना ऊबाठा नेत्याचे आरोप बिनबुडाचे आहेत. केवळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर टीका करून राजकीय नौटंकी केली जात आहे. गेली अडीज वर्षे शिवसेना (उबाठा) सत्तेत होती. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना कणकवली विधानसभा मतदार संघामधील आरोग्य यंत्रणेची आठवण झाली नाही का ?डॉक्टर असतील किंवा अपूरा कर्मचारी असेल तसेच आवश्यक आरोग्य तपासणी मशनरी हे सत्तेत असताना का उपलब्ध करु शकले नाही?आता केवळ जनतेची दिशाभूल करणारे आरोप करून आपल्या वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी शिवसेनेतील त्रिकुटांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला मिलिंद मेस्त्री यांनी लगावला आहे.

सध्या आरोग्य शिबिर भरवताना लागणारी यंत्रणा ही शासनाची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी, तिथला कर्मचारी तसेच शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात केल्या जात आहेत,असे असताना एकीकडे राज्य सरकारवर व स्थानिक आमदार व आरोग्य यंत्रणेवर टीका करायची व व्हेंटीलेटरवर असल्याचे सांगून त्याच आरोग्य यंत्रणेचा वापर करून आरोग्य शिबिर घ्यायची. जर आरोग्य यंत्रणा सक्षम नाही तर शासकीय यंत्रणा वापरून शिबिर का भरवता ? असा प्रश्न उपस्थित करीत आरोग्य यंत्रणेवर टीका करून त्याच आरोग्य यंत्रणेला हाताशी धरून शिबिर घ्यायची हे धोरण शिवसेना उबाठा गटाचे आहे. आमदार नितेश राणे यांनी अपुरा स्टाफ उपजिल्हा रुग्णालयाला देऊन डॉक्टर व रुग्णांची होणारी गैरसोय दूर केली. तसेच जिल्हा नियोजनमधून दुरुस्ती साठी निधी आणला. उपजिल्हा रुग्णालयातील CRM मशीन नसल्यामुळे रुग्णांना ऑपरेशन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करावी लागत होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी लक्षात घेवून जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून होणारी गैरसोय दूर केली. केवळ आंदोलन आणि उपोषण करायची व माध्यमांमध्ये चर्चा करायची हे काम शिवसेनेच्या त्रिकुटाचे असल्याचा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी केला आहे.