मालवणात सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात चोरी; तीन महिलांना अटक

मालवण, दि.२४ जानेवारी

मालवण शहरातील सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातील १५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करुन पलायन केलेल्या तीन महिलांना देवगड पोलीसांनी शिरगाव देवगड येथे ताब्यात घेतले. तीन महिलांना मालवणमध्ये आणल्यानंतर त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांची वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे.

दि. २२ जानेवारी रोजी दुपारी मालवण सोमवार पेठ येथील मे. गोपाळ नारायण कारेकर ज्वेलर्स यांच्या दुकानातील १५ हजार रुपये किमतीच्या वाटी आकाराच्या डवल्या तसेच सोन्याचे चार मणी असे २ ग्रॅम ५०० मिली वजनाचे दागिने तीन महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरुन नेले. याबाबतची तक्रार महेश कारेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीसांनी तीन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केला होता. आज देवगड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी देवगड पोलीसांच्या मदतीने शिरगाव देवगड येथे संशयित तीनही महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर तीनही महिलांना मालवणात आणल्यानंतर अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांचीही वैयतिक जामिनावर मुक्तता करण्यात आली.