हळवल फाटा येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या कार चालकाचे नियंत्रण अपघात

कणकवली दि.24 जानेवारी(भगवान लोके)
मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील अवघड वळणाचा अंदाज न आल्याने पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास झाला. या अपघातात अनुप अमित जाधव (20), अर्जुन आशिष खिनवासरा (20), आदित महेश आखेगावकर (20, तिघेही रा. पुणे) यांना गंभीर दुखापत झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.
आदित आखेगावकर हा आपल्या ताब्यातील कार घेवून दोन मित्रांसमवेत गोवा येथे पर्यटनासाठी जात होता. दरम्यान कणकवली उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येत असताना हळवल फाट्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालक आदित आखेगावकर याचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार रस्त्यालगत असणार्‍या मातीच्या ढिगार्‍यावर आदळून 100 मीटरवर पलटी झाली. यात अनुप अमित जाधव याच्या डोळ्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली तसेच चालक व आदित आखेगावकर व अर्जुन खिनवासरा यांनाही गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात, विनायक चव्हाण, पोलिस नाईक रुपेश गुरव, कॉन्स्टेबल मकरंद माने, वाहतूक पोलिस हवालदार आर. के. पाटील यांच्यासह महामार्ग वाहतूक उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी, हवालदार रविंद्र बुचडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना स्थानिक नागरिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी भरधाव वेगात कार चालवून मित्रांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आदित आखेगावकर याच्यावर अनुप जाधव याच्या फियार्दीवरून कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.