सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे आमरण उपोषण स्थगित!

दोन दिवसात देवगड ग्रामीण रुग्णालय ब्लड स्टोरेज सेंटर कार्यान्वित होणार -डॉ श्रीपाद पाटील

देवगड,दि.२५ जानेवारी

देवगड ग्रामीण रुग्णालय येथे सन २०१५ साली ब्लड स्टोरेज सेंटर मंजूर झालेले आहे परंतु ते आज मीतीपर्यंत आठ वर्षे एवढा कालावधी उलटून सुद्धा कार्यन्वित होऊ शकले नाही हे मंजूर असलेले ब्लड स्टोरेंज सेंटर विनाविलंब तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग नगरी यांना देण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी गुरुवारी दुपारी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे सदस्य व अन्य यांचेशी ग्रामीण रुग्णालय देवगड या ठिकाणी भेट घेऊन देवगड ग्रामीण रुग्णालयात मंजूर असलेले ब्लड स्टोरेज सेंटर येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्याचे लेखी आश्वासन दिले व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणारे उपोषण स्थगित करण्यात यावे अशी सूचना केली त्या अनुषंगाने सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेले प्रजासत्ताक दिनीचे आमरण उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश जाधव ,जिल्हा कार्यकारणी सदस्य विजयकुमार जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील निवासी वैद्यकीय अधीक्षक एस. पी. इंगळे यांनी देवगड येथे ग्रामीण रुग्णालयात येऊन ब्लड स्टोरेज सेंटरची पाहणी केली व अपूर्ण असलेल्या सोयी सुविधा पूर्ण करून ब्लड स्टोरेज सेंटर येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या .यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय विटकर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. श्रीपाद पाटील म्हणाले दुर्मिळ रक्त गट वगळता उर्वरित सर्व गटांच्या प्रत्येकी दोन बॅग याप्रमाणे या ठिकाणी ब्लड बँक मध्ये उपलब्ध करून दिल्या जातील पुढे मागणीनुसार याचा पुरवठा करण्यात येईल. देवगड येथील सेंटर २५ ब्लड बॅग एवढी क्षमता असून या पुढील काळातील नियमितपणे कार्यरत असेल असे आश्वासने त्यांनी यावेळी बोलताना दिले. रक्त मित्र प्रतिष्ठानच्या वतीने २६ जानेवारी रोजी पूकारण्यात आलेल्या आमरण उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी सिंधुरक्त प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य विजयकुमार जोशी, जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, देवगड तालुका सचिव प्रकाश जाधव, कार्यकारी सदस्य राजेंद्र पाटील ब्लड कोऑर्डिनेटर ऍड प्रसाद करंदीकर नगरसेवक बुवा तारी नितीन बांदेकर, सदस्य लहरिकांत पटेल, भावेश पटेल, चंद्रशेखर तेली ,नंदन घाटे, अनिल कोरगावकर, रविकांत चांदोरकर उपस्थित होते.