रेल्वेत अंताक्षरी म्हटल्याने कॉलेज युवक – युवतींवर गुन्हा

परस्परविरोधी फिर्यादीनुसार एका आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा ; कणकवलीत पोलिस संरक्षणात वाढ

कणकवली,दि.२५ जानेवारी( भगवान लोके )

कणकवली येथील एका कॉलेज मधील युवक युवती मुंबई येथील चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने मडगांव एक्सप्रेसने 19 जानेवारीला निघाले होते. त्या युवक युवती अंताक्षरी खेळत होत्या. दरम्यान वाटेत फिर्यादी जास्मिन आसिफ शेख ( वय 27 राहणार चेंबुर मुळ वरवडे ) हिने श्रीरामचे गाणी म्हणू नका आम्हाला त्रास होतो असे म्हणत वाद घातला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी संबंधित अनोखळी 7 युवक युवतींवर गुन्हे दाखल केले आहेत. तर यातील एका युवतीने संशयीत आरोपी आसिफ शेख रा. वरवडे याने आपण मुंबईत जाक असताना रेल्वेत चुकीचे वर्तन करुन आपला विनयभंग केला असल्याची फिर्याद रेल्वे पोलिसांकडे दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास कणकवली पोलिसांकडे शुन्य नंबरने आला आहे.

दरम्यान या प्रकरणात विनयभंग प्रकरणी संशयित आसिफ शेख याला कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी याने या गुन्ह्यात केलेल्या कृत्याबद्दल चौकशी केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभुमिवर भाजपा आ. नितेश राणे यांनी कणकवली पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून संबंधित आरोपी विरुध्द कठोर कारवाई करावी . अशी मागणी केला. या दोन्ही प्रकरणांचा तपास कणकवली पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र गाडेकर करत आहेत.