लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे -जिल्हाधिकारी किशोर तावडे

कणकवली तहसीलदार कार्यालय, कणकवली कॉलेज आणि विद्यामंदिर हायस्कूल संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदान दिन

कणकवली दि.२५ जानेवारी(भगवान लोके)
या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेने सामान्य नागरिकांना जे हक्क दिले आहेत. त्यामधील महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदान आहे. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. त्यामुळे १८ वर्षावरील सर्वांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.

कणकवली तहसीलदार कार्यालय, कणकवली कॉलेज आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वा राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी श्री. तावडे बोलत होते. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, कणकवली कॉलेज प्राचार्य युवराज महालिंगे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करबेळकर उपस्थित होते. परशुराम गंगावणे म्हणाले, आपले मत हे राजकीय पक्षाच्या हितासाठी नव्हे तर ग्रामीण विकासाबाबत कशाप्रकारे फायदेशीर ठरेल हे पाहून मतदान करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच किशोर तावडे यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या, आत्ताच जे वर्ष चालू आहे ते अमृतकाळ चालू आहे. अमृत काळात नवीन मतदान नोंदणी केलेल्या मतदारांना अमृत काळातच मतदानाचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे संविधानाने जो अधिकार दिला आहे त्याबाबत जागरूक राहून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे सांगितले.
१४ वा राष्ट्रीय मतदान दिनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मतदानाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. त्यानंतर नवीन नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांना मतदान ओळखपत्राची वाटप करण्यात आली. उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीधर पाटील, उत्कृष्ट नायब तहसीलदार प्रिया हर्णे, उत्कृष्ट बी. एल. ओ. मनोज गवाणकर, संतोष मेस्त्री, नीलांबरी पवार यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच वकृत्व, रांगोळी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक दादा कुडतडकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी गावडे, संजय मालंडकर, राजेंद्र पेडणेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व कणकवली कॉलेजचे आणि विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तर आभार प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी मानले.