राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात मालवणच्या तिघींची निवड

मालवण,दि.२५ जानेवारी

राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात रिद्धी हडकर, समृद्धी भगत आणि उर्जा साळगावकर या तिन्ही मालवणच्या खेळाडूंची, तर संघाच्या प्रशिक्षकपदी सौ. शीतल जाधव यांची निवड कर्नाटक मंड्या येथे होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा व राज्यभरातून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघात जिल्हयासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे मालवण तालुक्यातील एकूण तीन खेळाडूंची निवड झालेली आहे. हडकर, भगत आणि साळगावकर या तिघी येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या माजी विद्यार्थिनी आहेत.

यापूर्वी २००६ मध्ये मालवणच्या मंदार ओरसकर याची १७ वर्षांखालील गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. आता तब्बल १७ वर्षानंतर एकाचवेळी मालवणचे तीन खेळाडू राष्ट्रीय संघात खेळणार असल्याने शहराच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. २४ ते २७ जानेवारी दरम्यान कर्नाटक, मंड्या येथे १९ वर्षांखालील मुले व मुलींची राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धा होत असून स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झाले.

१९ वर्षांखालील या मुलींच्या संघात कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात बारावीत शिकणारी व मालवण येथील जय गणेश कबड्डी संघातून खेळणारी खेळाडू रिद्धी नितीन हडकरची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ती कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करत आहे. मूळच्या मालवण येथील आणि सध्या मुंबई शहरातून खेळणाऱ्या उर्जा साळगावकर व समृद्धी भगत यांचीही या संघात निवड झाली आहे. कै. कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, कबड्डीमध्ये पीएचडी मिळविलेले कणकवली वरचीवाडी येथील रहिवासी डॉ. मिलिंद जाधव यांच्या पत्नी, राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सौ. शितल जाधव यांची प्रशिक्षिका म्हणून निवड झाली आहे. देवगड कॉलेजमध्ये पूर्वी आणि सध्या सांगली विटा येथे कार्यरत असणारे अमोल जमदाडे यांची संघ व्यवस्थापकपदी निवड झाली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेकरिता रवाना झालेला संघ असा-कल्याणी कडोळे, रिद्धी हडकर, स्नेहल कोळी, आर्या पाटील, सुरेखा कदम, तनुश्री ठाकरे, आरती चव्हाण, समृद्धी भगत, वैष्णवी काळे, गौरी दहे, उर्जा साळगावकर, कल्याणी मेहेर, प्रशिक्षक शितल मारणे-जाधव, व्यवस्थापक अमोल जमदाडे.