मालवण,दि.२५ जानेवारी
राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन आज मालवण शहरात तहसीलदार कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीच्या दृष्टीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. लोकशाहीचा आधार, जागरूक मतदार… आपली जबाबदारी व अधिकार, मजबूत लोकशाहीचा अधिकार असे विविध संदेश देणारे फलक यावेळी झळकविण्यात आले.
मालवण देऊळवाडा येथून सकाळी साडे अकरा वाजता मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीस सुरुवात झाली. देऊळवाडा येथून भरड नाका मार्गे बाजारपेठ ते तहसीलदार कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली. तहसीलदार कार्यालय येथे सर्वांना मतदार जनजागृती बाबत शपथ देण्यात आली. या रॅली मध्ये तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, युवक, युवती, पत्रकार व नागरिक सहभागी झाले होते.