तारकर्लीतील रापण मच्छिमार गुंडू कांदळगावकर यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे निमंत्रण

 मालवण,दि.२५ जानेवारी

नवी दिल्ली येथे कर्तव्यपथ येथे २६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष अतिथी म्हणून मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील पारंपारिक रापण मासेमारी व्यावसायिक श्री. गुंडू जानू कांदळगावकर यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी सौ. शितल गुंडू कांदळगावकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या निवडीचे पत्र मत्स्य विभागामार्फत गुंडू कांदळगावकर यांना देण्यात आले असून ते कांदळगावकर दाम्पत्य आज दिल्ली येथे रवाना झाले.

दिल्ली येथे उद्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळा कर्तव्यपथावर साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून विशेष अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी मच्छिमार बांधवांची यादी मत्स्य विभागाकडून केंद्र शासनाला पाठविण्यात आली होती. केंद्र शासनाने एकूण १६ मच्छिमार बांधवांची त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून अंतिम निवड केली. यामध्ये तारकर्ली येथील कांदाळगावकर रापण संघांचे प्रमुख गुंडू जानू कांदळगावकर व त्यांची पत्नी सौ. शितल कांदाळगावकर यांची निवड करण्यात आली.त्याच्या या निवडीबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.