मालवण,दि.२५ जानेवारी
तळाशील तोंडवळी समोरील खाडीपात्रात दिवस रात्र सुरु असणाऱ्या वाळू उत्खननावर कठोर कारवाई करून तात्काळ उत्खनन थांबवावे, तळाशील किनारपट्टीचा भूभाग खचून खाडी पात्रात तयार झालेला सॅन्डबार ड्रेझरच्या साहाय्याने उपसा करून पुन्हा किनारपट्टीवर टाकण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन कालावल खाडीपात्रात 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देणाऱ्या तळाशील तोंडवळी येथील महिला व ग्रामस्थांशी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी गुरुवारी सकाळी चर्चा केली. मात्र, उपोषणावर ठाम असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट करत प्रशासनाच्या वाळू उत्खनन कारवाई नंतरच पुढील भूमिका स्पष्ट करू असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, तळाशील तोंडावळी येथे पोलीस निरीक्षकांसॊबत आपण स्वतः भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करु. ग्रामस्थांना अपेक्षित असलेली कारवाई अधिक तीव्र करू, मात्र ग्रामस्थांनी उपोषण करू नये असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले.
तळाशील व तोंडवळी येथील ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालय येथे तहसीलदार पोलीस प्रशासन, बंदर विभाग यांच्या संयुक्त बैठकीत आक्रमक स्वरूपात भूमिका मांडली. वाळू व्यवसायिकांकडून आम्हा ग्रामस्थांना धमकीही देण्यात आली आहे. असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. कालावलं खाडीपात्रात सुरु असलेला वाळू उपसा बंद झालाच पाहिजे, परप्रांतीय वाळू कामगार यांचा गावात सुरु असलेला वावर, यामुळे गावात गुन्हे घडण्याची शक्यता असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनधिकृत वाळू बंद व्हावीच, सोबत या भागात कोणतेही अधिकृत टेंडर लावण्यात येऊ नये. तळाशील वाडी समोरील किनारपट्टी खचून वाहून गेलेली वाळू पुन्हा किनाऱ्यावर टाकली जावी. वाळू चोरीवर कारवाईसाठी गावात कायमस्वरूपी महसूल व पोलीस कर्मचारी नियुक्त करावे, कांदळवन संरक्षित राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, तोंडावळी ग्रामपंचायत क्षेत्रात 75 टक्के महिला असून वाळू बंदी बाबत त्यांच्या मताचा आदर करून वाळू बंदीचा ठराव ग्रामसभेत होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश व्हावा. गावातील परप्रांतीय कामगारांची ग्रामपणंचायतीत नोंद व्हावी, तसेच किनारपट्टीवरील् सर्व होड्यांची तपासणी व्हावी, यासह विविध मागण्या यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार तहसीलदारांसमोर मांडण्यात आल्या. तसेच गावात होऊ घातलेली नळपाणी योजना काही पारंपरिक येण्याजाण्याचे मार्ग यालाही वाळू व्यवसायिकांकडून अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून त्याबाबतही आपण लक्ष घालावे अशीही मागणी करण्यात आली.
किनारपट्टीवर गेले वर्षभर मोठ्या प्रमाणात वाळू उपासा सुरु असून शासनाचा दरदिवशी लाखो रुपयाचा महसूल बुडवला जात आहे. याचीही सखोल चौकशी व्हावी, आमच्या किनारपट्टीवर अनधिकृत व अधिकृत कोणत्याही प्रकारचा वाळू उपसा होता नये, ज्या वाळू उपसा होड्या अनधिकृतरित्या किनाऱ्यावर आहेत त्या फोडून टाकण्यात याव्या अशीही मागणी करण्यात आली.