तातडीची बैठक घेत माजी आ.प्रमोद जठार यांच्याशी प्रशासनाची चर्चा ; पुढील आठवड्यात पुन्हा बैठकीचे आश्वासन
कणकवली दि.२६ जानेवारी(भगवान लोके)
मुंबईतील टाटा हॅास्पिटल व के.ई.एम हॅास्पिटल येथे राज्याच्या कानाकोप-यातून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मोठया प्रमाणात येणारा गोर गरीब रूग्ण व नातेवाईक येतात.त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना फूटपाथवर राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांनी महानगरपालिकाकडे रूग्ण व नातेवाईक यांच्या राहण्याची सोय व्हावी याकरिता २६ जानेवारी रोजी “लाक्षणिक उपोषण” करणार असल्याची भूमिका घेतली होती. त्याबाबत पोलिस प्रशासन व महानगरपालिकेच्यावतीने तातडीने बैठक के.ई.एम हॅास्पिटलच्या अधिष्ठाता संगिता रावत यांनी घेत प्रश्नांबाबत प्रशासनाने चर्चा केली.पुढील आठवड्यात पुन्हा अतिरिक्त आयुक्त यानी या प्रश्नांबाबत बैठकीचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे प्रमोद जठार यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे.
के.ई.एम हॅास्पिटलच्या अधिष्ठाता संगिता रावत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.या बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार , प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
के.ई.एम हॅास्पिटल परिसर “हेल्थ कॅारीडोअर”करण्यात यावे. महानगर पालिकेचा बंद असलेला शाळा व नवीन पुर्नविकास प्रकल्पामध्ये बिल्डर्सकडून एफएसआय बदल्यात मिळणारा जागेमध्ये रूग्ण व नातेवाईक यांची राहण्याची सोय करावी, अशी आग्रही मागणी प्रमोद जठार यांनी केली. त्यावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी अधिष्ठाता डॅा.संगिता राव यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याशी फोनवरून संपर्क करून माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक घेण्यात यावी,असे सांगितले. त्यांनी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी, असे आदेश दिले. त्यावर माजी आमदार प्रमोद जठार यांनी महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी मराठा मोर्चाचा पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवर असलेला ताण लक्षात घेवून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर माजी आ.प्रमोद जठार यांनी लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे .
जोपर्यंत मुंबईतील टाटा व के.ई.एम हॅास्पिटल येथे रुग्ण व नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा देखील यावेळी माजी आ.प्रमोद जठार यांनी दिला आहे.