अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सौजन्याने विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावर पुजन व ध्वजारोहण

देवग,दि.२६ जानेवारी
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सौजन्याने व विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधुन, प्रजासत्ताक दिनी विजयदुर्ग किल्ल्यावर पुजन व ध्वजारोहण करण्यात आले.
शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या पवित्र विजयदुर्ग किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्ष, २६ जानेवारी २०२४ रोजी, विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, ग्रामस्थ व विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग, मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत, आपल्या देशाचा परमप्रिय तिरंगा व भगवा ध्वज मोठ्या अभिमानाने फडकविण्यात आला.
सदर कार्यक्रमावेळी ध्वजारोहणानंतर शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले, ध्वजस्तंभ व शिवप्रतिमेच्या समोर उभे राहून किल्यांचे जतन आणि स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सौजन्याने, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मुख्य सल्लागार राजेंद्र रघुनाथ परूळेकर यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.