केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती उपोषण तुर्तास स्थगित

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची माहिती ; माजी आम. तेलींचा पुढाकार

प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणा

सावंतवाडी :दि.२६ जानेवारी
सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणुन रेल्वेमंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात भेट घालून देतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या मध्यस्थीने दिले तसेच राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तात्पुरते उपोषण स्थगित केले मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या २३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आलं. सायंकाळी माजी आमदार राजन तेली यांनी प्रतिनिधी म्हणून या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी उपोषणकर्त्यांचा भ्रमणध्वनीवरून
संवाद करून दिला. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. राणेंनी दिलेल्या आश्वासनानंतर हे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आलं.

केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घडवून देत दोन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्री राणेंनी दिल्यानं आम्ही तुर्त हे उपोषण स्थगित करीत आहोत. परंतु, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारीपासून याच ठिकाणी ‘आमरण उपोषण’ छेडणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी दिली.

दिवसभरात हजारो नागरिक, विविध संघटनांनी या लाक्षणिक उपोषणला पाठिंबा दिला. सावंतवाडी तालुका पत्रकार संघान देखील आपला पाठिंबा याला जाहीर केला. सायंकाळी माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद करून दिला. यावेळी मंत्री राणे म्हणाले, कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी यासाठी माझा प्रयत्न आहे. कोकण रेल्वेवर सहा हजार कोटीच कर्ज आहे. त्यामुळे कोकण रेल्वेकडून विकास काहीही होत नाही. यासंदर्भातील पत्र राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिलेल आहे. प्रा मधू दंडवते यांचे नामकरणाबाबत मी आत्ताच आश्वासन देऊ शकत नाही. मात्र, उर्वरीत विषयांसाठी मी पुढाकार घेईन, प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्यासोबत बैठक लावून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असं ठोस आश्वासन मंत्री नारायण राणे यांनी दिलं. माजी आमदार राजन तेली यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन लावत उपोषणकर्त्यांशी संवाद साधून दिला. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर म्हणाले, माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा करून दिली. रेल्वे टर्मिनस व रेल्वे गाड्यांच्या थांब्याबाबतच्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत. त्यासाठी येत्या ७ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घडवून देण्याचं आश्वासन मंत्री नारायण राणे यांनी दिलं. त्यांच्यासमक्ष या मागण्या मंजूर करून देतो असं त्यांनी आश्वास्त केलं आहे‌. केंद्रीय मंत्री राणेंवर विश्वास ठेवून आजच लाक्षणिक उपोषण आम्ही तात्पुरत स्थगित करत आहोत. आंदोलन स्थगित केलं असल तरी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. जर २३ फेब्रुवारी पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्या दिवसापासून आम्ही आमरण उपोषणाला याच ठिकाणी बसणार आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर त्याबाबत काय करायचं हा निर्णय घेऊ, मंत्री नारायण राणेंचा व त्यांनी दिलेल्या शब्दाचा आदर करत आजच उपोषण तुर्त स्थगित करत आहोत अशी माहिती अँड . निंबाळकर यांनी दिली.

याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, भुषण बांदिवडेकर, जगदीश मांजरेकर,शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, पुंडलिक दळवी, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, विहंग गोठोस्कर, सुधीर राऊळ, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, विनायक गांवस, राज पवार, तेजस पोयेकर, गुरुदास गवंडे, समीर वंजारी, आदी उपस्थित होते.