बौद्ध बांधवांनी सर्वेक्षण नोंद केली असल्यास सुधारणा नोंद करून घ्यावी-अध्यक्ष शामसुंदर जाधव

देवगड,दि.२७ जानेवारी

महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण संदर्भात घरोघरी सर्वेक्षण चालू आहे. सर्वेक्षण सुरु असताना बौद्ध जातीच्या प्रश्नावलीत समावेश नसल्याने बौद्ध धर्मियांची नोंद घेता येत नव्हती. परंतु सर्वेक्षण ॲपमधील इतर म्हणजे अदर कॉलममध्ये सर्च केल्यावर बौद्ध जात ओपन होत होती. परंतु त्या ॲपमध्ये सर्व माहितीचे कॉलम ओपन होत होते व अनुसूचित जातीच्या रकाणांमध्ये धर्मांतराच्या पूर्वीच्या जातीचा उल्लेख होत होता त्यामुळे देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ तळेबाजार यांचे वतीने तहसीलदार देवगड यांना २४ जानेवारी रोजी निवेदन देऊन त्यामध्ये आपण सन १९६० साली धर्मांतर केलेले असून आमचा धर्म व जात बौद्ध असल्याने बौद्ध समाजाची सर्वेक्षणामध्ये नोंद करताना धर्म व जात बौद्ध अशीच करण्यात यावी असे कळविले होते. त्याप्रमाणे तहसीलदार देवगड यांनी सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांना पाठविले होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी त्यांच्याकडील जावक क्रमांक ३५१/२०२३/प्रशिक्षण १९९ दिनांक २४ जानेवारी अन्वये अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारणा कायदा १९७६ नुसार अनुसूचित जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नसल्याने नवबौद्ध व्यक्तींची त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी असे आदेश संबंधितांना पारित करण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध पुन्हा देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ तळेबाजार या संघाच्या पदाधिकारी व बौद्ध बांधवांनी २५ जानेवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेऊन खालील मुद्द्यावर निवेदन दिले. अनुसूचित जाती व जमाती सुधारणा कायदा १९७६ च्या कायद्याप्रमाणे हे म्हणणे चुकीचे असून आणि अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात धर्मांतर करीत असताना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने घटना अनुसूचित जाती आदेश सुधारणा कायदा १९९० दि.३/६/१९९० नुसार बौद्ध धर्म यांची अनुसूचित जातीमध्ये नोंद केलेली आहे. सन १९९० च्या आदेशान्वये बौद्ध अनुसूचित जातीमध्ये येत असताना सर्वेक्षणाच्या ॲपमध्ये तशी नोंद का देण्यात आली नाही अशी विचारणा करून सन १९९० च्या आदेशाने बौद्ध अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असताना बौद्ध जातीची नोंदणी स्वतंत्र इतर ठिकाणी घेण्यात यावी. हे सर्वेक्षण मराठा यांच्याकरिताच असेल तर सर्वेक्षणामधून बौद्ध धर्मियांना वगळण्यात यावे. वरील मुद्द्यांच्या विचार होऊन बौद्ध अशीच नोंद करण्यात आली नाही तर बौद्ध धर्मीय जुन्या जातीने नोंद करण्यास तयार नाहीत. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयुक्त पुणे यांनी २५ जानेवारी २०२४ च्या पत्रामध्ये आरक्षित जाती यादीत बुद्धिस्ट नाव बौद्ध अनुसूचित जाती अशी नोंद घेण्याबाबत संबंधितांना आदेश देऊन तशी सॉफ्टवेअर एप्लीकेशनमध्ये दुरुस्ती करणेबाबत कळविले होते. त्याप्रमाणे सॉफ्टवेअर मध्ये बदल करून सर्वेक्षण चालू करण्यात आलेले आहे. याची धम्म बांधवांनी खात्री करून नोंद घ्यावी. तसेच २३ जानेवारी २४ व २५ जानेवारी या कालावधीमध्ये बौद्ध बांधवांनी सर्वेक्षण नोंद केली असल्यास सुधारणा नोंद करून घ्यावी असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. या शिष्टमंडळात सेवा संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सल्लागार विजय कदम, खजिनदार प्रभाकर साळसकर, सहसचिव संजय जाधव, सदस्य नितेश जाधव संतोष कदम ,संतोष साळसकर, समीर शिरगावकर, दीपक नाईक, सुनील जाधव , दीपक जाधव, आनंद देवगडकर उपस्थित होते.