वेंगुर्ला,दि.२७ जानेवारी
वेंगुर्ला शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी गतिरोधक घालण्यात आलेले आहेत. मात्र, गतिरोधक असल्याचे फलक नसल्याने या ठिकाणी अपघात घडत आहेत. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शहरात गतिरोधक असल्याबाबतचे फलक नसल्याने त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास होत असून एखादा गंभीर अपघात होऊन कोणाचाही जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी फलक असणे आवश्यक असूनही प्रशानाला त्याचा विसर पडला आहे. शहरातील काही रस्ते वेंगुर्ला नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येत असल्याने दोन्ही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा. अपघात होऊन जीवित हानी झाल्यास हे दोन्ही प्रशासन जबाबदार राहतील असा इशाराही अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.