वरवडे येथे मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल

कणकवली दि.२७ जानेवारी(भगवान लोके)

रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या वरवडे मुस्लिमवाडी(चेंबूर येथील स्थायिक ) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून भाजपा पदाधिकाऱ्यांनी लाकडाने तसेच
हाताच्या ठोशानी मारहाण केल्याची फिर्याद आसिफ शेख याने कणकवली पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी दाखल केली. तर आसिफ शेख याने भाजपा पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची फिर्याद भाजपा पदाधिकारी पपू पुजारे याने दिली.त्यानुसार परस्पर विरोधी संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,आसिफ शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत, माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, आशिये सरपंच महेश गुरव, वरवडे उपसरपंच अमोल बोंद्रे, वरवडे तंटा मुक्त समिती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे, निलेश देसाई, मगेश कदम, पपू पुजारे वरवडे, रोहित ठाकूर आशिये, विजय इंगळे, पपू यादव कलमठ आदी १५ते २० जणांच्या समूहाने आसिफ शेख याच्या घरात घुसुन त्याला मारहाण केली.तसेच जय श्रीराम बोल असे सांगितले,या नुसार फिर्याद दिली. त्यानुसार सर्व संशयितांवर भादवी कलम २९७ अ ,३२४, ५०४,३४ आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर कणकवली पोलिसात पपू पुजारे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सलमान शेख,आसिफ शेख याने वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवून धार्मिक तेढ निर्माण केले. तसेच आसिफ शेख याने लाकडी दांड्याने राजेश उर्फ सोनू सावंत, पपू पुजारे याना मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार आसिफ शेख याच्यावर भादवी २९५ अ , ३२४, ५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.