टॉवर २५ मीटर उंचीचा दुसऱ्या लाईनवर कोसळल्याने वीज खंडीत
कणकवली दि.२८ जानेवारी(भगवान लोके)
राधानगरी येथून सिंधुदुर्गला विद्युत पुरवठा करणाऱ्या शिवडाव येथील ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा टॉवर २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने गॅसकटरने कापून खाली पाडला. यामुळे महापारेषण, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.हा टॉवर खालून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनवर पडल्याने शिवडाव परिसरातील काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.
याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी संजय कळविकट्टे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ जानेवारी रोजी मध्यरात्री २.१० वा. च्या सुमारास राधानगरीहूनहून कणकवली येथे वीजपुरवठा करणाऱ्या ११० केव्ही लाईनच्या मनोऱ्याचा पाया अज्ञात व्यक्तीने गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमता दस्तऐवज अधिनियम १९८४ च्या कलम ३ व भादंवि कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
२५ रोजी उत्तररात्रीनंतर व २६ रोजी पहाटेच्या पूर्वी हा प्रकार घडला. यातील अज्ञात हा माहीतगार असण्याची शक्यता आहे. कारण रस्त्यापासून जवळ असलेला टॉवर कापण्यात आला आहे. टॉवरपर्यंत गॅसकटर व आवश्यक साहित्याचे वाहन नेऊन नंतरच हा टॉवर कापण्यात आला आहे. तसेच टॉवर कापताना एका बाजूचे खांब अगोदर कापून एका बाजूने भार आल्यानंतर दुसरे खांब कापण्यात आल्याने तो एका बाजूला पडल्याचे दिसून येत होते. हा टॉवर पडत असताना तेथूनच शिवडाव व परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही लाईनवर पडल्याने परिसरातील दोन ट्रान्सफॉर्मर फॉल्टी झाले होते. त्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.टॉवर पडताना लाईन तुटली असती . टॉवर कापताना अत्यंत सावधगिरी बाळगत हे दुष्कृत्य करण्यात आहे.
त्यानंतर लाईनवरील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा शनिवारी सुरळीत करण्यात आला. टॉवर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून तात्काळ टॉवर उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे पारेषणचे अधिकारी संजय कळविकट्टे यांनी सांगितले.