साहित्यिक व लेखकांनी संकुचित पद्धतीने लेखन करु नये

सम्यक साहित्य कला संगितीच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांचे आवाहन

कणकवली दि.२८ जानेवारी(भगवान लोके)

: साहित्यिक व लेखकांनी संकुचित पद्धतीने लेखन करु नये. त्यांनी समाजातील दलित, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न व समस्या समजून घेत त्यावर सडेतोड लिखाण केले पाहिजे. समाजातील माणुसकी व मानवता अबाधीत राहण्यासाठी बुद्ध व आंबेडकरवादी साहित्यिक व लेखकांनी एकत्रित आले पाहिजे,असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आयोजित दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांनी केले.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीतर्फे कणकवली येथील मराठा मंडळाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीचे उद्घाटन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक मोहनदास नैमिशराय यांच्या हस्ते झाले. यावेळी उर्मिला पवार बोलत होत्या.
यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव, ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, डॉ श्रीधर पवार, प्रा. आनंद देवडेकर, सुनील हेतकर, दीपक पवार, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, प्रा. आशालता कांबळे, सुधीर जाधव, प्रा. विजय मोहिते, भावेश लोखंडे, प्रा. डॉ. संजय खैरे, संजय गमरे, विठ्ठल कदम, संदेश जाधव आदी उपस्थित होते.

उर्मिला पवार म्हणाल्या, कोकण प्रांतातील साहित्यिक व लेखकांसाठी दुसरी सम्यक साहित्य कला संगिती
आयोजित करण्याचा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचा उपक्रम स्तुत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारला होता. या लढ्यामुळे दलित हे समाजाच्या मुख्य प्रवाहात आले.
जागतिकीकरणामुळे सर्वसामान्यांचे जगणे असहाय्य झाले आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
मोहनदास नैमिशराय म्हणाले, महाराष्ट्रातील साहित्यिक व लेखकांनी देशांतील इतर प्रांत फिरून त्याठिकाणचे समाजजीवन समजून घेतले पाहिजे देशातील विविध प्रांतांमधील दलित, उपेक्षित, वंचित, दुर्लक्षितांचे प्रश्न व समस्या साहित्यिक व लेखकांनी जाणून घेत त्यावर लिखाण केले पाहिजे. तुमच्या लिखाणामुळे त्यांना न्याय मिळेल. गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार व विचार युवा पिढीने आत्मसात केले पाहिजेत.

राजेंद्र मुंबरकर म्हणाले, नवोदित साहित्यिक व लेखकांना साहित्याचे अंग माहिती नाही. हे जग त्यांना ज्येष्ठ साहित्यिक व लेखकांनी समजून सांगणे गरजेचे आहे.

यावेळी अजयकुमार सर्वगोड, श्रीधर पवार, संजय खैरे, डॉ. रवींद्र जाधव, ज. वि. पवार यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी ज़्येक पत्रकार विनायक मिठबावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. रवींद्र जाधव यांना अपरान्त भूषण म्हणून गौरविण्यात आले यावेळी अपरान्त या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संदेश पवार यांनी प्रास्ताविक केले. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल कदम यांनी आभार मानले.
फोटो ओळ-कणकवली येथे सम्यक साहित्य कला संगिती कार्यक्रमाचे उद्घाटन मोहनदास नैमिशराय यांच्याहस्ते झाले .यावेळी उर्मिला पवार, अजयकुमार सर्वगोड, ज. वि. पवार आदी उपस्थित होते.