पाईपलाईनसाठी खोदाईमुळे मालवण- तारकर्ली रस्त्याची दुर्दशा

मालवण,दि.२८ जानेवारी

नौदल दिनाच्या अनुषंगाने मालवण तारकर्ली रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असताना जलजीवन मिशन अंतर्गत या रस्त्याच्या दुतर्फा पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने या रस्त्याचे नुकसान होऊन माती रस्त्यावर आली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून पावसाळ्यातही हा रस्ता खचण्याची भीती आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी भाजयूमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण व तारकर्ली येथे ४ डिसेंबर रोजी साजऱ्या झालेल्या नौदल दिनाच्या पूर्वी मालवण तारकर्ली रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र उशिरा जाग आलेल्या जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुतर्फा पाण्याच्या पाईप लाईन साठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे खोदाईची माती रस्त्यावर आली असून रस्त्याच्या साईड पट्टीचेही नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला आलेल्या मातीमुळे अपघाताची परिस्थितीत निर्माण झाली असून या रस्त्याने दुचाकीने प्रवास करणे मुश्किल बनले आहे. या खोदाईमुळे पावसाळ्यातही हा रस्ता खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, असे सौरभ ताम्हणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.