इतर संस्थांनी वेताळ प्रतिष्ठानचे अनुकरण करा-भाई मंत्री

वेंगुर्ला,दि .२८ जानेवारी

मी गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात असून वेताळ प्रतिष्ठान सारखे समाजाभिमुख कार्य पाहिलेले नाही. अनेक क्षेत्रांत काम करीत असताना प्रतिष्ठानने जो मापदंड घालून दिला त्याचे अनुकरण इतर संस्थांनी केल्यास अनेक सामाजिक उपक्रमातून लोकांचे कल्याण होईल असे प्रतिपादन उद्योजक भाई मंत्री यांनी केले.

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा तब्बल ३५ गटात संपन्न झाल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, विविध क्षेत्रातील व्यक्तिचा सन्मान सोहळा आणि खुल्या ग्रुप डान्स आणि खुल्या जोडीनृत्य स्पर्धांचे उद्घाटन उद्योजक भाई मंत्री व सामाजिक कार्यकर्ते जालिंदर परब यांच्या हस्ते २१ जानेवारी रोजी झाले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती दादासाहेब परुळकर, सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, उद्योजक दादा झांट्ये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री परुळेकर, निवृत प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, गजानन नाटेकर, सूरज परब, मुख्याध्यापक अँथोनी डिसोजा, माजी प.स.सभापती अनुश्री कांबळी, नारायण नागवेकर, सुजाता पडवळ, माजी सरपंच शंकर घारे व विजय रेडकर, आनंद तांडेल, अरविंद नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत चिमणी पाखरं डान्स अकॅडमीने बहारदार सादरीकरण करत विजेते ठरले. तर खुल्या जोडी नृत्य स्पर्धेत सोहम जांभोरे व ऋत्विक ठाकर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. दोन्ही नृत्य स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणा-या कर्तृत्ववान व्यक्तीचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये कोरोना काळात तसेच नैसर्गिक आपत्ती, वादळे आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री दत्तात्रय परुळेकर, दशावतारमध्ये पहिले आत्मचरित्र लिहिणारे ज्येष्ठ दशावतार मास्टर दामू जोशी, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दै.लोकमतचे पत्रकार प्रथमेश गुरव, तर कै.बाबली विष्णू परुळकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिमा राजेश पेडणेकर आणि तुळशीदास मधुकर पाटकर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग सांगलीच्या सहायक विभागीय अधिकारीपदी नेमणूक झाल्याबद्दल मुख्याध्यापक अँथोनी डिसोजा, निवृत्त प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, सर्पमित्र अनिल गावडे, रक्तदान क्षेत्रात योगदान देणारे लिस्टर ब्रिटो यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान उद्योजक भाई मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी घेतलेल्या खुल्या ग्रुपडान्समध्ये चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी-कुडाळ (प्रथम), सिद्धाई अॅकॅडमी-कुडाळ (द्वितीय), आर.डी.एक्स ग्रुप-सावंतवाडी (तृतीय), एस.के.ग्रुप-कणकवली व ओमी डान्स अॅकॅडमी-तळवडे (उत्तेजनार्थ), खुल्या जोडी नृत्य स्पर्धेत प्रथम-सोहम जांभोरे व जयेश सोनुर्लेकर, द्वितीय-दिशम परब व जयेश सोनुर्लेकर, तृतीय-दिक्षा नाईक व संजना पवार, उत्तेजनार्थ-सिद्ध बोभाटे व निखिल कांबळे, स्वरा व दुर्वा पावसकर, शालेय मुलांसाठी रांगोळी स्पर्धेत प्रथम-चिन्मय कुडपकर (वेंगुर्ला), द्वितीय-काशिनाथ तेंडोलकर (मठ), तृतीय-चेत्रश्री बुगडे (तळवडे), उत्तेजनार्थ – वैष्णवी कोचरेकर व निधी पेडणेकर (उभादांडा) यांनी यश मिळविले.

नृत्य स्पर्धेचे परीक्षण महेंद्र मातोंडकर आणि कथ्थक विशारद मृणाल सावंत यांनी तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण अनिल परुळकर यांनी केले.सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. निवेदन प्रा.डॉ. सचिन परुळकर तर आभार बी.टी.खडपकर यांनी मानले.