मालवणात ११ रोजी वैश्यवाणी समाज वधू – वर परिचय मेळावा

मालवण,दि .२८ जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाजाचा ३६ वा वधू – वर परिचय मेळावा दि. ११ फेब्रुवारी रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती वैश्यवाणी समाजाचे मालवण तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण तालुका वैश्यवाणी समाजाची बैठक होऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी तालुकाध्यक्ष महेश अंधारी, नितीन तायशेटे, शैलेश पावसकर, गणेश कुशे, समीर वर्दम, समीर म्हाडगुत, सुरेखा वाळके, संगीता तायशेटे, रुपेश तायशेटे, नितीन माणगावकर, महेंद्र म्हाडगुत, प्रशांत पारकर, मंदार गाड, सुषमा तायशेट्ये, सुचिता तायशेट्ये, बाबाजी बांदेकर, विनायक पारकर, विकास तायशेट्ये, रोहिणी तायशेट्ये, नेहा तायशेट्ये आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी महेश अंधारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाज वधू वर परिचय मेळाव्याचे यावर्षीचे यजमानपद मालवण तालुक्याकडे आहे. आठ वर्षानंतर पुन्हा एकदा मालवणला यजमानपद मिळाले आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता या मेळाव्यास सुरुवात होऊन सायंकाळी ५.३० वाजता समाप्ती होणार आहे. या मेळाव्यात डॉ. मनिष कुशे, माजी आमदार प्रमोद जठार आदी व अन्य मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर वधू वर परिचय होणार आहे. तर दुपार नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

जिल्हाभरातून सुमारे १ हजार समाज बांधव व भगिनी उपस्थित राहतील. या मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या वैश्यवाणी समाजातील वधू- वर यांच्यासाठी गुगल फॉर्म द्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. जिल्हा बाहेरील समाज बांधव देखील या मेळाव्यात सहभागी होतील. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या वैश्यवाणी समाज तालुकाध्यक्ष यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून सहकार्य करावे, मालवण तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील समाज बांधवांच्या सहकार्यातून हा मेळावा यशस्वी करू, असा विश्वासही महेश अंधारी यांनी व्यक्त केला.