भंडारी हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक ए. के. सोहनी यांचे निधन.

मालवण,दि .२८ जानेवारी

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनंत केशव सोहनी (वय ९७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. एक विद्यार्थी प्रिय आणि हाडाचा शिक्षक म्हणून सोहनी सरांची ख्याती होती.

मूळ कोल्हापूरचे रहिवासी असणारे अनंत केशव सोहनी हे १९५८ मध्ये मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते . तत्पूर्वी ते रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे शिक्षक म्हणून नोकरीस होते. १९८२ मध्ये ते भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक बनले. तीन वर्ष त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार लिलया पेलला. गणित आणि सायन्स हे विषय शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. अलीकडे पर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे व त्यांच्या कार्यात सहभाग दर्शवायचे.१९७७ च्या आणीबाणी विरोधी आंदोलनात त्यांचा सहभाग होता निवृत्त लष्करी अधिकारी रत्नाकर सोहनी आणि कोल्हापूरचे बिल्डर विद्याधर सोहनी यांचे ते वडील होत

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.