मुंबई,दि.२९ जानेवारी
सेंट्रल माटुंगा, मुंबई येथे अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त बृहन्मुंबई मनपा तसेच श्री. रमाकांत बिरादार, उपायुक्त, परि. 2 यांच्या सुचनेनुसार बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जेष्ठ मूर्तीकार श्री. मनोहर बागवे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पारंपारिक माती मूर्तीकार यांचा मेळावा पार पडला.
या मेळाव्यासाठी अनेक मान्यवर निमंत्रक मंडळी उपस्थित होती. देवरूख आर्ट कॉलेज चे प्राचार्य श्री. रणजित मराठे सर, नागपूरहून श्री. पाठक आणि सहकारी, रत्नागिरी हून श्री. राऊत, बृहन्मुंबई गणेशोत्सव महासंघाचे श्री. सरनौबत, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष श्री. गजानन (अण्णा) तोंडवळकर, माती मूर्तीकार संघटक श्री. अशोक कडू, मूर्तीकार श्री. अंकुश कांबळी, जेष्ठ मूर्तीकार श्री. दीपक सुर्वे, मूर्तीकार श्री. संजय चिरनेरकर, मूर्तीकार श्री. किरण आकेरकर, मूर्तीकार श्री. सत्यविजय कांबळी, युवा मूर्तीकार श्री. अवधूत चव्हाण, माटुंगा पोलिस स्टेशन चे निरीक्षक श्री. जुवाटकर, श्री. गायकवाड व त्यांचे सहकारी आदी मान्यवर तसेच इतर अनेक मूर्तीकार बंधू भगिनी उपस्थित होते.
निवेदिका प्रा. सौ अमिता राणे यांनी अतिशय आकर्षक शैलीत निवेदन केले.
प्रथेप्रमाणे प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर श्री. अरुण सावंत यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गणेश वंदना सादर केली.
तर प्रास्ताविक श्री. किरण आकेरकर यांनी त्यांच्या परखड व मार्मिक शैलीत केले.
प्रस्तावनेत श्री. किरण आकेरकर यांनी मेळावा घेण्याच्या मुख्य उद्धेशांबद्दल विस्तृत पणे माहिती दिली. हा मेळावा मुर्त्या बनविण्यासाठी उपयोगात येणारे इतर कुठलेही माध्यम किंवा पर्याय यांना विरोध करण्यासाठी नसून, माती मूर्तिकार यांच्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय याबाबत विचारविनिमय, मातीचे मूर्तीकार यांचे रजिस्ट्रेशन बाबतची चाचपणी इ. साठी असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच अनेक मान्यवर मंडळींनी तमाम मुर्तीकारांसाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री. रणजित मराठे , श्री. पाठक, श्री. सरनौबत इ. नी त्यांच्या भाषणातून मूर्तीकाराना बहुमोल असे मार्गदर्शन केले. तर श्री. अण्णा तोंडवळकर यांनी बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाची सुरुवात व वाटचाल इ. ची माहिती देत सर्व मूर्तीकाराना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
श्री. मनोहर बागवे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माती मूर्तीकाराना भेडसावणारे प्रश्न, समस्या, त्यांच्या रजिस्ट्रेशन संबंधित होत असलेली चाचपणी इ. बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
मूर्ती घडविण्यासाठी उपयोगात येणारी इतर माध्यमे आणि पर्याय यांना उठसूठ विरोध करीत न बसता मातीची मूर्तिकला कशी वृद्धिंगत होईल व त्यातून प्रत्येक मूर्तीकाराला आपला उत्कर्ष कशाप्रकारे साधता येईल, याबाबत साधक बाधक विचारविनिमय करण्यात आला. त्या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तसेच मनपा तर्फे करण्यात येणाऱ्या माती मूर्तीकार रजिस्ट्रेशन संदर्भात चर्चा करण्यात आली.मान्यवर पाहुणे मंडळी तसेच अनेक मूर्तीकार बंधू भगिनींचे सत्कार देखील यावेळी करण्यात आले.
श्री. किरण आकेरकर यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, प्रयत्न केले त्यांचे आभार प्रदर्शन करण्यात आले.