परिवर्तन व आंबेडकरवादी मंडळींनी जातीयता नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा

ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी मांडली भूमिका

कणकवली २९ जानेवारी (भगवान लोके)

अलीकडच्या काळात जगात हिंसा वाढून शांतता भंग होत चालली आहे. ही हिंसा रोखून पुन्हा शांतात प्रस्थापित करायची असेल तर बुद्धिस्ट व आंबेडकर तत्वज्ञान माणसांमध्ये रुजवणे नितांत गरजेचे आहे.बुद्धिस्ट व आंबेडकर तत्वज्ञानाला विज्ञानाचा आधार आहे. हे तत्वज्ञान आत्मसात केल्यामुळे व्यक्तीला प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वासही वाढतो. दलितांना शिक्षणसह अन्य क्षेत्रांची कवाडे खुली झाली. मात्र, अद्यापही समाजातील जातीयता नष्ट झालेली नाही. ही जातीयता नष्ट करण्यासाठी परिवर्तन व आंबेडकरवादी मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे.असे मत ज्येष्ठ साहित्यिका तथा दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांनी व्यक्त केले.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीतर्फे येथील मराठा मंडळाच्या सभागृहात दुसरी सम्यक साहित्य कला संगिती आयोजित केली आहे. या संगितीमध्ये उर्मिला पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, कार्याध्यक्ष इंजि. अनिल जाधव, अरुणी जगयाशी उपस्थित होत्या.

उर्मिला पवार म्हणाल्या,समाजात स्त्री व पुरुष समानता निर्माण होणे आवश्यक आहे. संविधानावर चालणारा आपला भारत देश मागील काही वर्षांत चुकीच्या मंडळींच्या हाती सत्ता दिल्यामुळे मी म्हणणे ते योग्य अशा पद्धतीने ही मंडळी देशाचा कारभार चालवत आहेत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी व्यक्त केली. २५०० वर्षांपासून समाजात जातीयता आहे. या जातीयतेच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा देऊन दलित बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.

‘आयदान’ या माझ्या पुस्तकामध्ये मी सामाजिक विषमतेवर भाष्य केले आहे. आजच्या विज्ञानयुगात माणूस भावना विसरू लागला आहे. केवळ पैसा व वस्तू खरेदीच्या मागे लागला आहे, ही स्थिती भयंकर वाईट आहे. त्यामुळे साहित्यिकांनी माणसांच्या हरवत चाललेल्या भावना पुन्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

बुद्धिस्ट व आंबेडकर तत्वज्ञानात हिंसा करायची नाही, असे सांगितले आहे. पुरातनवादी विचारसरणीच्या लोकांचे मन परिवर्तन करण्यासाठी आंबेडकरवादी मंडळींनी पुढाकार घेत त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. सर्वसामान्य पुरुष डिपरेशनखाली आहे. त्यामुळे तो व्यसनांच्या आहारी जात चालला आहे. त्याचे परिणाम कुटुंबाला भोगावे लागत आहे, हे वास्तव खूप भीतीदायक आहे. माणसांचे मने दुभंगलेली आहेत. त्याचे साईट इफेक्ट कुटुंब व समाजाला सोसावे लागत आहे. कुटुंबातील संवाद संपला असून विसंवाद वाढला आहे. पालक व पाल्यांमध्ये अबोला दिसून येतो, ही स्थिती कुटुंब व समाजासाठी घातक आहे.

समाजामध्ये बदल होण्यास खूप काळ लागतो. कारण समाजातील प्रत्येक घटकाच्या मनाच्या जागीवा जागृत होण्यासाठी वेळ जातो. या जाणीवा जागृत झाल्यानंतर समाजात बदल दिसून येतो. हे बदल होण्यामध्ये ज्ञानवंत, साहित्यिक, लेखक यांचा सिंहाचा वाटा असतो, असे त्यांनी सांगितले.

विज्ञानामुळे सूर्य व चंद्रासह अन्य ग्रहांवर यान पाठवत आहोत. मात्र, सध्याचे सरकार हे पुन्हा जुन्या रुढी व परंपरांकडे आणि जातीयतेकडे नेऊ पाहत आहे. त्यामुळे परिवर्तन व आंबेडकरवादी चळवळीत काम करणाऱ्या मंडळींनी सरकारविरोधात लढा उभारून त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच विज्ञानवर आधारित असलेले बुद्धिस्ट व आंबेडकर तत्वज्ञान प्रत्येकाने आत्मसात करावे. कारण या तत्वज्ञानामुळे जगात शांतता प्रस्थापित करण्याची ताकद आहे, असे ज्येष्ठ साहित्यिका तथा दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगितीच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांनी सांगितले.