आशिये सरपंच महेश गुरव यांची आ.नितेश राणे यांच्याकडे मागणी ; मार्चनंतर काम सुरु होणार
कणकवली दि.२९ जानेवारी(भगवान लोके)
कणकवली आचरा मार्गावर आप्पासाहेब पटवर्धन चौक ते कलमठ बाजारपेठपर्यंत सातत्याने होणा-या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून आचरा बायपास रस्त्याच्या निर्मितीचा निर्णय झाला. या रस्त्यासाठीची प्रक्रिया सुरु होऊन सुमारे १२ ते १३ वर्ष उलटली. मात्र अदयाप रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. वरवडे फणसनगर ते कलमठ, आशिये या गांवातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन काही वर्षे उलटली तरीही प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरु झालेले नाही,तरी तातडीने हा रस्ता करण्यात यावा,अशी मागणी आ.नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांनी केली.त्यावर आ.नितेश राणे यांनी आगामी बजेटमध्ये सदर कामाचा समावेश करावा,अशा सूचना कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगोड यांना दिल्या आहेत.त्यामुळे मार्चनंतर या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे आशिये सरपंच महेश गुरव यांनी सांगितले.
आ.राणे यांना दिलेल्या निवेदनात,आचरा बायपास या रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी कणकवली ते आशिये पर्यंतच्या रस्त्यासाठी पोस्ट विभागाच्या जागेचा अडथळा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सुमारे १२ ते १३ वर्षे उलटली. मात्र अदयाप रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे सुमारे अर्धा किमी रस्त्याचे भूसंपादन होऊ शकलेले नाही. मात्र, वरवडे फणसनगर ते कलमठ, आशिये या गांवातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन काही वर्षे उलटली तरीही प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. या बायपास रस्त्यासाठी कणकवली ते आशिये हद्दीपर्यंत अर्धा किमी रस्त्याचे भूसंपादन होईपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशिये ते फणसनगर पर्यंत सुमारे अडीच किमी रस्त्याचे भूसंपादन व सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने हे काम तातडीने सुरू करण्यात यावे. जेणेकरुन आवश्यकतेनुसार आशिये ते वरवडे फणसनगर म्हणजेच आचरा रोड पर्यंतचा प्रवास करणे सोयीची होणार आहे. तरी तातडीने आचरा बायपास रस्ता काम तातडीने सुरु करण्यात यावे,असे म्हटले आहे.