ग्रामपंचायत करुळ, सह्याद्री जीव रक्षक व केसी काॅलेज मुंबईचे आयोजन
वैभववाडी,दि.२९ जानेवारी
करूळ गावातील नदीमध्ये अस्ताव्यस्त पडलेला प्लास्टिक कचरा तसेच इतर कापड गोळा करत नदी स्वच्छ करण्यात आली. या स्वच्छतेमुळे नदीने मोकळा श्वास घेतला आहे. प्लास्टिक मुक्त नदी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत करूळ, के.सी. काॅलेज एनएसएस विभाग मुंबई व सह्याद्री जीव रक्षक करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही नदी स्वच्छता मोहीम सोमवारी राबविण्यात आली.
या मोहिमेत शंभरहून अधिक विद्यार्थी व युवक सहभागी झाले होते. जवळपास तीन ते चार किलोमीटर नदीचा परिसर युवक व विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. नदीत वर्षानुवर्ष अडकलेला प्लास्टिकचा कचरा व बॉटल बाहेर काढण्यात आल्या.
यापूर्वीही ग्रामपंचायत करूळ, सह्याद्री जीव रक्षक करुळ व पत्रकार समिती वैभववाडीच्या वतीने प्लास्टिक मुक्त घाट मोहीम राबविण्यात आली होती. घाट रस्त्यातील संपूर्ण कचरा, संपूर्ण प्लास्टिक गोळा करण्यात आला होता. करुळ येथे के.सी. काॅलेज मुंबई राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत शंभर विद्यार्थी दाखल झाले आहेत. नदी स्वच्छता उपक्रम शुभारंभ प्रसंगी सरपंच नरेंद्र कोलते, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत, शिक्षक विलास गुरव, बबलू कोलते, सिद्धेश कोलते, ग्रामसेवक शशिकांत गुरव, सह्याद्री जीव रक्षक सदस्य विजय सावंत, एनएसएस विभाग प्रमुख डॉ सतिश कोलते, सागर पवार, जयदास पवार, बाबू गुरव, रमेश कोलते, उदय कदम, विद्यार्थी, सह्याद्री जीव रक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेचे सर्वांकडून कौतुक होत आहे.