भारतीय लोकशाही, संविधान यांच्या संरक्षणासह धर्मांधता व हुकूमशाही वृत्तीला कठोर विरोध करण्याचा ठराव संमत
कणकवली दि.३० जानेवारी(भगवान लोके)
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने कणकवली येथील आ. सो. शेवरे साहित्य नगरीत दिनांक २७ व २७ जानेवारी रोजी पार पडलेल्या दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप पार पडला. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण ठराव संमत करून भारतीय लोकशाही, संविधान यांचे ठामपणे संरक्षण करणे व देशातील वाढती हुकूमशाही व धर्मांधता यास कठोर विरोध करणे, यांचा त्यात समावेश आहे. विविध कार्यक्रमाने संगीतीचा रविवारी समारोप झाला.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दोन दिवसांपासून मराठा नाट्यगृह कणकवली येथे आ. सो. शेवरे साहित्य नगरीत दुसर्या सम्यक साहित्य कला संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतीच्या समारोप प्रसंगी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज. वि पवार, संगीतीच्या अध्यक्षा लेखिका उर्मिला पवार, कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, उपाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे, लेखक रमाकांत जाधव, प्रबोधिनीचे सरचिटणीस संदेश पवार, सुनील हेतकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, लेखक डॉ. श्रीधर पवार, स्वागताध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी समारोप करताना प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा.आनंद देवडेकर यांनी दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या निमित्ताने संमत केलेल्या ठरावांचे वाचन केले. ठराव पुढीलप्रमाणे-
१. ही संगीती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध करते. २) ही संगीती भारतीय संविधानात अधोरेखित करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष ढाच्याच्या संरक्षणास्तव कटीबद्ध असल्याचा उद्घोष करते. ३) ही संगीती अपरान्तातील बौद्ध वारसा जतन करण्याचा संकल्प करते. ४) ही संगीती ब्राह्मी लिपी(धम्मलिपी) व पाली भाषेच्या प्रचार प्रसाराचा पुनरुच्चार करते. ५) ही संगीती अपरान्त प्रदेशात बौद्ध धम्माचा प्रचार
प्रसार गतिमान करण्यासाठी प्रभावी व पूरक साहित्य निर्मितीचा निश्चय करते. या प्रमुख ठरावांसह इतर काही ठराव करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता तानाजी खरावतेकर मंचावर ‘जलसा टू रॅप’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व शाहीर तथा प्रबोधिनीचे राष्ट्रपाल सावंत यांनी आंबेडकरी जलशाचे सादरीकरण केले, तर युवकांचा प्रतिनिधी येशु उर्फ यश धर्मपाल सकपाळ यांनी स्वलिखित रॅप गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी तर आभार दीपक कांबळे यांनी मानले. त्यानंतर अकरा वाजता कथा वाचन- अभिवाचन हा कार्यक्रम मनोहर कदम मंचावर पार पडला. त्यात कल्पना मलये यांनी उर्मिला पवार यांची चौथी भिंत कथा संग्रहातील ‘कवच’ ही कथा, लेखक रमाकांत जाधव यांनी सके या कथा संग्रहातील स्वतःची ‘बुद्धाचा मेहुणा’ ही कथा, सुनील हेतकर यांनी ‘इस्तव’ संग्रहातील हिपपाॅप-रॅपवर आधारित ‘फेमज्वर’ ही कथा आणि निलेश पवार यांनी सिद्धार्थ देवधेकर यांची ‘न सांगितलेली गोष्ट’ मधील ‘बॉय’ या कथेचे सुंदर प्रकारे अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश लोखंडे यांनी तर आभार प्रा. संतोष वालावलकर यांनी केले.
दुपारी नाटककार अरुण कदम, बुद्धदास कदम व सिनेअभिनेता संदेश जाधव यांची प्रकट मुलाखत अभिनेते अशोक चाफे यांनी घेतली. या मुलाखतीतून त्यांचा कलाक्षेत्रातला दीर्घ प्रवास व त्यामधील अनेक अनुभव यांचे संचित त्यांनी उलगडून दाखवले. या कार्यक्रमाचे आभार प्रकाश तेंडुलकर यांनी मानले.
दुपारनंतर झालेल्या बा. स. हाटे मंचावर ‘साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या परिसंवादात कवी प्रा. प्रवीण बांदेकर , नाटककार अरुण कदम व प्रा. शिवराज गोपाळे यांनी मांडणी केली. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अाशालता कांबळे होत्या. या परिसंवादातून सर्वच मान्यवरांनी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा इतिहास सांगतानाच मराठी साहित्य समीक्षेची परिभाषा आणि आंबेडकरी साहित्याची परिभाषा वेगळी असल्याची जाणीव या निमित्ताने करून दिली. आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्याला नवे निकष लावावे लागतील, शिवाय नव्या काळात आंबेडकरी साहित्य प्रवाहात नवे समीक्षक उदयाला येत असल्याची जाणीवही अाशालता कांबळे यांनी करून दिली.
शेवटच्या सत्रात दलित पॅंथरचे संस्थापक ज. वी. पवार यांची प्रकट मुलाखत डॉ. श्रीधर पवार व संदेश पवार यांनी घेतली. या मुलाखतीतून ज. वी. पवार यांनी आपल्या समग्र जीवनाचा आढावा उपस्थितांसमोर मांडताना भविष्यकालीन आपले संकल्प, योजना यांची माहिती करून दिली. नव्या पुस्तकांची आखणी करीत असल्याचे त्यांनी सांगून वाचकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गमरे व आभार आनंद तांबे यांनी मानले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाला साहित्यिक रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.