उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरु

सावंतवाडी दि.३० जानेवारी
सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारांनी पोलिस पाटील पदासाठी परीक्षा दिली ती बहुचर्चित होती. याबाबतचा घोळ दूर झाला आहे त्यामुळे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी पात्रं,अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सावंतवाडी उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरु असून सदर पदांची दि. ७ जानेवारी रोजी रोजी परिक्षा घेण्यात आलेली आहे.

सदर परिक्षेनंतर परिक्षार्थी यांची लेखी परिक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त होती, विचारलेले प्रश्न १० वी च्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते, विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे संदिग्ध होती अशा प्रकारची विविध निवेदने प्रांताधिकारी कार्यालयास प्राप्त झालेली आहेत.

सदर निवेदनांच्या अनुषंगाने प्रांताधिकारी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत तज्ञ व्यक्तींची समिती नियुक्ती करुन तज्ञ अधिका-यांच्या समितीमार्फत प्रश्नांची पडताळणी करुन तद्नंतर निकाल जाहीर करणे उचित ठरेल असे ठरविण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनातील प्राप्त आक्षेपास अनुसरुन काढण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप तपासून आक्षेपनिहाय अहवाल प्राप्त करुन घेणेकरिता तज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली व लेखी परिक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी तपासून तसेच उमेदवारांच्या निवेदनातील, वृत्तपत्रातील बातम्यांतील मुद्दयांच्या अनुषंगाने आपला अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करणेबाबत कळविणेत आलेले होते. त्यानुसार समितीने खालीलप्रमाणे अहवाल सादर केलेला आहे.प्रश्न क्र. ८, ११, १३, २६, २७, ३३, ४७, ४८, ५७, ७७, ७९, ८० इत्यादी पश्नांची काठिण्यपातळी पोलीस पाटील पदाच्या अर्हतेपेक्षा अधिक होती तसेच प्रश्न क्र. २१, २३, २४, ५० हे प्रश्न व त्यांचे पर्याय संदिग्ध स्वरुपाचे आढळून आले असल्याने सदर प्रश्नांचे गुण देण्याबाबत शिफारस केलेली आहे, असे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी म्हटले आहे.

या समितीचा अहवाल अवलोकनात घेवून परिक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासणी करण्यात आलेल्या असून उपरोक्त प्रश्नांचे गुण सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मुलाखतीस पात्र/अपात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखतीबाबत जाहिर सूचना स्वतंत्ररित्या काढण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.