‘सारथी‘च्या योजनांचा प्रसार

वेंगुर्ला,दि.३० जानेवारी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये हायटेक कॉम्प्युटर येथे सीएसएमएस-डीप हे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ‘सारथी‘ संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाच्या समाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत काम करते. या संस्थेमार्फत सर्व जिल्हा परिषद तसेच एमकेसीएल यांना सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांच्या माहितीचे प्रजासत्ताक दिनादिवशी ग्रामपंचायत स्तरावर होणा-या कार्यक्रमामध्ये चावडी वाचन करण्यात यावे असे पत्राद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार हायटेक कॉम्प्युटरच्या पुनम म्हारव व दया पालव यांनी परबवाडा येथे, रिया शेटये व प्रणोती नाईक यांनी उभादांडा येथे, आकृती कासले, पूनम रेडकर व दिव्या धर्णे यांनी आडेली येथे, आकांक्षा गोळम, प्रजली सावंत, स्नेहा परब व सुरभी परब यनी तुळस येथे, प्रज्योत कुडपे, अक्षय आगलावे व रामचंद्र धर्णे यांनी खानोली येथे तर तन्वी गावडे हिने अणसूर येथे विविध योजनांची माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांनना हायटेक कॉम्प्युटरतर्फे भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.