फोंडाघाट ग्रा.प.समोरील कंपाउंड भिंत अनधिकृत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्वाळा

 नागरिक समीर सामंत यांनी उभारलेल्या लढ्याला यश !

फोंडाघाट,दि.३० जानेवारी(संजय सावंत)
फोंडाघाट ग्रामपंचायत समोर बांधण्यात आलेली कंपाउंड भिंत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता बांधली गेली असल्याने तसेच देवगड निपाणी राज्यमार्ग लगत असलेल्या या भिंती चे बांधकाम करताना रस्त्याच्या मध्य बिंदूपासून 37.00 मिटर अंतर सोडणे आवश्यक असताना ही दक्षता न घेता बांधकाम केल्यामुळे पथकीनारवर्ती नियमाचा भंग झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी ही भिंत अनधिकृत ठरविली असून सदरचे बांधकाम हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रामपंचायत फोंडाघाट यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान फोंडाघाट ग्रामपंचायत समोर कंपाउंड भिंत बांधण्यात येत असताना येथील नागरिक समीर सामंत यांनी ऑक्टोंबर 2023 मध्ये फोंडाघाट ग्रामपंचायत कडे ही कंपाउंड भिंत राज्य महामार्ग ला लागून असल्याने याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली आहे का ? या बाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती मात्र याबाबत माहिती अधिकारी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली मात्र पुन्हा सामंत यांनी नोव्हेबर 2023 ला ग्रामपंचायत निवेदन देऊन सदरच्या कामाबाबत विस्तृत माहिती मिळेपर्यंत बांधकाम थांबवावे व सदरच्या ठेकेदाराचे कोणत्याही स्वरूपात बिल अदा करू नयेत अशी मागणी करून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे 29 डिसेंबर 2023 ला निवेदन करून सदर कंपाउंड भिंत राज्य महामार्गालगत असून ही भिंत बांधकाम अधिकृत आहे अनधिकृत याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली होती.
दरम्यान या नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या सदरच्या कामाची माहिती घेत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी ग्रामपंचायत फोंडाघाट ला देवगड निपाणी रस्ता रा.मा. 178 वरील कि.मी. 52/940 मध्ये आपण रस्त्याच्या मध्यबिंदू पासून 7.50 मिटर अंतरावर उजवे बाजूस 26.40 मिटर मापाच्या कंपाउंड भिंती चे बांधकाम केले आहे. उपरोक्त हा रस्ता राज्यमार्ग दर्जाचा असून पथकीनारवर्ती नियमानुसार कोणतेही नवीन बांधकाम करताना रस्त्याच्या मध्यबिंदूपासून 37.00 मिटर अंतर सोडणे आवश्यक असताना ही दक्षता आपण न घेतल्यामुळे सदरचे कंपाउंड भिंतीचे बांधकाम अनधिकृत ठरविण्यात येत असल्या बाबतचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे समीर सामंत यांनी उभारलेल्या या लढ्याला यश मिळाल्याचे बोलले जात आहे.