उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्याचा मान सावंतवाडीला – तहसीलदार श्रीधर पाटील यांचा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

सावंतवाडी, दि.३१ जानेवारी
प्रत्येक मतदारांचा घरोघरी जावून सर्व्हे, नव मतदार नोंदणी, पीएसई, डिएसई, कोकण पदवीधर मतदार नोंदणी अशा निवडणूक कामामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना जिल्ह्यातून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कणकवली तहसीलदार कार्यालय, कणकवली कॉलेज आणि विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने 14वा राष्ट्रीय मतदान दिन कणकवली येथे साजरा करण्यात आला. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, पत्रकार अशोक करबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मानाला उत्तर देताना श्रीधर पाटील म्हणाले की, हा प्राथमिक स्वरूपाचा पुरस्कार असून माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे.  त्यामुळे हा पुरस्कार सावंतवाडी तालुक्याचा असून तो मी स्वीकारल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. तसेच या कामांमध्ये श्रीमती तारी, श्री. मुसळे, श्री. चव्हाण, निवडणूक शाखेतील सर्व कर्मचारी, सुपरवायझर, कार्यालयीन कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, बुथ पातळीवरील अधिकारी यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रत्नागिरी येथे झालेल्या कोकण विभागीय महसूल स्पर्धेत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उत्तम कामगिरी करत स्वतः वैयक्तिक तसेच सिंधुदुर्ग महसूल संघाला पारितोषिक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.