कणकवली येथे ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४’ चे ११ फेब्रुवारी रोजी आयोजन!

कनक रायडर्स सायकल क्लबचा उपक्रम

कणकवली दि.३१ जानेवारी(भगवान लोके)

सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कनक रायडर्स सायकल क्लब, कणकवली व यांच्यावतीने ११ फेब्रुवारी रोजी, ‘स्वच्छ सिंधुदुर्ग आणि हरित सिंधुदुर्ग’ व ‘सायकल राईड सर्वांसाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी’ ही टॅगलाईन घेऊन ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४’ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती कनक रायडर्स सायकल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव रुपेश तेली , कैलास सावंत , मकरंद वायंगणकर , संजय बिडये , प्रसाद बुचडे , दिपक शिंदे , विष्णु रामागळे , सुमीत राणे , रोशन राणे , कृष्णा कांबळी , संजयकुमार कदम , वैभव वाधारे , नितीन मेस्त्री , देवेंद्र माळवदे आदी उपस्थित होते.
यावेळी रुपेश तेली म्हणाले, कनक रायडर सायकल क्लब, कणकवली स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच सायकलचा वापर दैनंदिन जीवनात वाढवण्यासाठी लोकांना विविध मार्गानी प्रेरित केले आहे. सायकलिंग विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवावे या दृष्टीने निसर्ग व मानवी मूल्यांची आजन्म जपणूक करण्याचा ध्यास घेऊन कनक रायडर्सच्यावतीने भव्य सायकल मॅरेथॉन आयोजित केली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रतिदिन ५ किलोमीटर पासून सुरू केलेला प्रवास प्रतिदिन २०० किलोमीटर पर्यंत कनक रायडर्सच्या अनेक सदस्यानी नेला आहे.
शिवजयंती, प्रजासत्ताक राईड, कोजागिरी नाईट राईड आयोजित करण्यात आली होती. इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ ही सायक्लोथॉन कुडाळ सायकल क्लब यांनी घेतल्यानंतर इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२४ चे यजमानपद, जिल्हा सायकल असोसिएशनच्या अनुमोदनाने कनक रायडर्स क्लबला मिळाले आहे.

ही स्पर्धा २५ किलोमीटर, ५० किलो मीटर व १०० किलोमीटर अशी विभागलेली असेल. त्यामध्ये यजमान सिंधुदुर्गासह गोवा, कर्नाटक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई येथील सायकलपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकालाच मेडल्स, सर्टिफिकेट्स व टी-शर्ट दिली जाणार आहेत.

या सायक्लोथॉनमध्ये २५ किलोमीटर गटात स्पर्धकांना कणकवली ते श्री देव रवळनाथ मंदिर करंजे असा परतीची, ५० किलोमीटर गटाकरिता कणकवली ते करंजे मार्ग मराठे कॉलेज फोंडा असा परतीचा, तर १०० किलोमीटर गटासाठी कणकवली, करंजे, मराठे कॉलेज फोंडा, नांदगाव ,शिरगाव ,तळेबाजार येथून परत आयनल फाटा ,चाफेड, भरणी ,तरंदळे, कणकवली असा मार्ग असेल.

यामध्ये २५ किलोमीटर दोन तास, ५० किलोमीटर चार तास व १०० किलोमीटर करिता सात तास असा वेळ निश्चित केला आहे. नियोजित मार्गावर क्लब तर्फे सपोर्ट व्हेईकल, रुग्णवाहिका सोबत तज्ञ सायकलस्वार अशा सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी ठेवली आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरून येणारे स्पर्धक सहभागी असतीलच. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जास्तीत जास्त सायकल स्वारांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कनक रायडर्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.
ही सायक्लोथॉन म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा, उत्तम आरोग्याचा संदेश देणारी रॅली म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सायक्लोथॉनमध्ये क्रमांकांना फारसे महत्व नसून अंतर पूर्ण करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे .ज्या सायकलिस्टना यामध्ये सहभाग घ्यावयाचा असेल .त्यांनी ९४२२६३३७२१,९४२२४३५५७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.